तावशी बायपासवर ट्रक फसला, वाहतूक खोळंबली

0
22

अर्जुनी-मोरगाव, दि.21 : शहरातील तावशी बायपास रोडवर ट्रक फसला. त्यामुळे चार तास वाहतूकीचा खोळंबा झाला. ही घटना आज मंगळवार, 21 सप्टेंबरला दुपारी एक वाजता दरम्यान घडली. रस्त्याच्या मधोमध ओव्हरलोड ट्रक फसल्याने तब्बल तीन तास वाहनांची दुतर्फा रीघ लागली होती.

गोंदिया-कोहमारा महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. गणेशनगर लगत इटीयाडोह कालव्यावर पुलाचे बांधकामही सुरू आहे. शिवालया कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाचे कंत्राट आहे. पुलालगत डायवर्सनची सोय नसल्याने यामार्गे होणारी संपूर्ण वाहतूक शहरातून तावसी बायपास मार्गे वळती करण्यात आली. ओव्हरलोड वाहतूक या मार्गाने वळती झाल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे आज गोंदिया ते तालुक्यातील वडेगाव येथे रस्त्याच्या मधोमध सिमेंट वाहतूक करणारा एम.एच.35 ए.जे.2359 क्रमांकाचा ट्रक फसला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मालवाहक गाड्यांच्या रांगांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. जेसीबीच्या सहाय्याने या ट्रकला सुरळीत काढण्यात आले. या वेळी वाहतूक पोलिसांनी मोर्चा सांभाळला होता.

ट्रक फसला, खर्च न देता दिवाणजी पसार

ट्रकला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी शहरातील नितीन नाकाडे यांचा जेसीपी बोलविण्यात आला. सदर कामाचा खर्च शिवालया कंपनी देणार अशी बोलणी झाली होती. अथक परिश्रमानंतर ट्रूकला खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र सदर कंपनीचा दिवाणजी खर्च न देता पसार झाल्याची माहिती जेसीबी मालक नितीन नाकाडे यांनी दिली.

शहरातून होणारी जड वाहतूक नगरपंचायतने बंद करावी

यामार्गे होणारी वाहतूक शहरातून वळती झाल्याने शहरात गाड्यांची वर्दळ वाढली. अपघाताची शक्यता बळावली आहे. शहरातील रस्ते खराब झाले आहेत. शहराच्या मध्यभागातून ही वाहतूक होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शहरातून होणाऱ्या वाहतूकीवर नगरपंचायतने निर्बंध घालण्याची मागणी होत आहे.