ओबीसी एकजूटीतूनच बहुजनांचीच सत्ता

0
8

नागपूर दि. २१: : या देशातील ओबीसी समाज हा एकजूट नाही. तो विखुरला असल्यामुळेच देशातील बहुजन समाज सत्तेपासून दूर आहे. या देशात बहुजनांची सत्ता येऊ नये म्हणून तो तसाच विखुरलेला राहावा, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे. ज्या दिवशी या देशातील ओबीसी समाज एकजूट होईल, त्यादिवशी या देशात बहुजनांची सत्ता येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी येथे केले.

बहुजन समाज पार्टीची विदर्भस्तरीय कार्यकर्ता आढावा बैठक शुक्रवारी मराठी साहित्य संकुल सभागृह सीताबर्डी येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृष्णा बेले, प्रेम रोडेकर, जितेंद्र म्हैसकर, प्रदेश प्रवक्ता सागर डबरासे, नागोराव जयकर, पृथ्वीराज शेंडे, विवेक हाडके, नरेश वासनिक, राजकुमार बोरकर, रूपेश बागेश्वर, गौतम गेडाम, संजय जयस्वाल, उत्तम शेवडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

विलास गरुड म्हणाले, बसपा ही देशातील सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचे काम करीत आहे. परंतु ज्याप्रमाणे दलित व आदिवासी समाज एकजूट दिसून येतात तसा ओबीसी समाज नाही. याला अनेक कारणे आहेत. मात्र ओबीसी समाजाने एकत्र येऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ओबीसी समाजासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजूनही ओबीसी समाजापर्यंत पोहोचले नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. बाबासाहेब आंबेडकरांना ओबीसी समाजापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. ओबीसी समाजाला त्यांचे मित्र कोण, आणि शत्रू कोण आहेत, हे पटवून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.