व्यसन सोडा, शौचालय बनवा-जि.प. अध्यक्ष मेंढे यांचे आवाहन

0
11

गोंदिया : विष्ठेवर बसणाऱ्या माशा रोगांचा प्रसार करतात. घरात शौचालय असेल तर आजारापासून आपला बचाव होईल. औषधांचा खर्च वाचेल. पुरूषांच्या तुलनेत घरातील महिला सर्वाधिक कामे करतात. त्याच्या आत्मसन्मानासाठी व्यसन सोडा आणि घरात शौचालय बनवा असे कळकळीचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी केले.गोंदिया तालुक्यातील चुटीया ग्रामपंचायतीत गुरूवारी (दि.१९) जागतिक शौचालय दिनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावडे, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख, जिल्हा परिषद मग्रारोहयो विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन.एस. भांडारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे, चुटीयाचे उपसरपंच रामू शरणागत, ग्रा.पं. सदस्य महेश परसगाये, हरिलाल गराकाटे, बसंती राऊत, टीकेश्वरी पटले, निर्मला शरणागत, मुन्नालाल तुरकर उपस्थित होते. चुटीया येथील जागतिक शौचालय दिनाच्या या कार्यक्रमातून जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात आले. मग्रारोहयोच्या माध्यमातून सुध्दा शौचालय बनविता येतात. मोडकळीस आलेल्या शौचालयाच्या बाबतीत शासनस्तरावर निर्णय होईलच. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, योजनांची माहिती घेण्यासाठी महिलांनी ग्रामसभेत उपस्थित रहावे, गावाच्या विकासात सहभाग घ्यावा, असेही जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे म्हणाल्या. दूषित पाण्यामुळे अतिसार, डास होतात. पाणी उघड्यावरील विष्ठेमुळे दूषित होते. आजारापासून बचावासाठी प्रत्येक घरात शौचालय झाले पाहिजे. महिला पुरूषांची ती गरज आहे. शिवाय ऊन, वारा, पावसाच्या दिवसात ते सोयीचे आहे. गाव स्वच्छ सुंदर झाल्यास गाव नावारूपास येईल. त्यासाठी नियोजित कालावधीत शौचालयाचे बांधकाम करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी.गावडे यांनी केले. जागतिक शौचालय दिनाची गरज, महत्व यावर जिल्हा परिषद मग्रारोहयो विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन.एस. भांडारकर यांनी, शौचालय बांधकामाचे महत्व जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख यांनी विषद केले. माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांनी गावाला हागणदारीमुक्त, स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी.गावडे यांनी गृहभेट करून डिब्बासिंग मुकुंदा वाढवे, उलासन बेनीराम वाढवे व रामदास मुुंकुंदा वाढवे यांच्या शौचालयाची पाहणी करून त्यांचा पुष्प देऊन सत्कार केला. शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या कांता शहारे, देवनाथ येलसरे यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. संचालन देवानंद डोंगरे तर आभार ग्रामसेवक व्ही.बी. सूर्यवंशी यांनी मानले.