राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन, सेना, भाजप, काँग्रेसकडे प्रत्येकी एक नगरपंचायत

0
10

गडचिरोली, दि. २६: आज पार पडलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाचपैकी दोन नगरपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने, तर शिवसेना, भाजप व काँग्रेसने प्रत्येकी एका नगरपंचायतीवर झेंडा फडकवला.

 कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी संबंधित नगरपंचायतीच्या कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. कोरची नगरपंचायतीचे अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे नसरुद्दीन भामानी ९ मते घेऊन विजयी झाले. त्यांना भाजपच्या ३ सदस्यांनी मदत केली. भामानी यांचे प्रतिस्पधी काँग्रेसचे शामलाल मडावी यांना ८ मते मिळाली. मडावी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ व ३ अपक्ष सदस्यांनी मतदान केले. नगरपंचायत उपाध्यक्ष म्हणून भाजपचे कमल खंडेलवार यांनी ९ विरुद्ध ८ मतांनी अपक्ष उमेदवार हिरा राऊत यांचा पराभव केला.

धानोरा येथे ललीत बरछा पॅनलच्या वर्षा महेश चिमूरकर नगराध्यक्ष झाल्या. त्यांनी भाजपच्या उमेदवार लीना साईनाथ साळवे यांचा १० विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. ललीत बरछा हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. श्री.बरछा व त्यांच्या समर्थकांनी नगरपंचायत निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने धानोऱ्यात आता काँग्रेसची सत्ता प्रस्थापित झाली आहे.

अहेरीत भाजपच्या उमेदवार प्राजक्ता सचिन पेदापल्लीवार १७ पैकी १७ मते मिळवून अविरोध विजयी झाल्या. अध्यक्षपदासाठी बंडखोरी केलेल्या भाजपच्या अश्विनी ठाकरे यांच्यासह राष्‍ट्रवादी काँग्रेस व अपक्ष सदस्यांनीही सौ.पेदापल्लीवार यांना मतदान केले. भाजपच्या अन्नपूर्णा सिडाम उपाध्यक्ष म्हणून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शैलेश पटवर्धन यांना ९ विरुद्ध ८ मतांनी पराभूत केले.

एटापल्ली नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता राजकोंडावार विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या उमेदवार निर्मला कोंडबत्तुलवार यांचा ११ विरुद्ध ५ मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे रमेश गंपावार निवडून आले. त्यांनी भाजपचे दीपक सोनटक्के यांना १० विरुद्ध ६ मतांनी पराभूत केले.

मुलचेरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष आत्राम बहुमतांनी विजयी झाले. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचेच देवा चौधरी विजयी झाले.  कुरखेडा, चामोर्शी, भामरागड व सिरोंचा नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक येत्या ३० तारखेला होणार आहे. यातील बहुतांश नगरपंचायतींमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र या ठिकाणीही काँग्रेस-राष्ट्रवादी युती होणार असल्याने भाजपला सत्तेपासून वंचित राहण्याची पाळी येणार आहे. कुरखेडयात शिवसेना-काँग्रेस एकत्र आले आहेत, तर भामरागड व सिरोंचामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे.