जलयुक्त शिवार योजना राजस्थानातही राबवणार, वसुंधराराजे शिंदें

0
15
नागपूर दि. १२ – मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना आता राजस्थान सरकार राबवणार आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त गावे जलसंकटापासून मुक्त करण्याकरिता सत्तेत आलेल्या भाजप सरकारने पहिल्याच वर्षी जलयुक्त शिवार योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणारी राज्य सरकारची ही योजना अतिशय उत्तम असून पुढील वर्षी २६ जानेवारीला राजस्थानात या योजनेचा शुभारंभ करणार असल्याची माहिती राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी नागपुरात दिली.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आयोजित कृषी प्रदर्शनीकरिता वसुंधराराजे शिदे शुक्रवारी नागपुरात आल्या होत्या. या वेळी नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली. शिदे म्हणाल्या की, नवी दिल्ली येथे नीती आयोगाच्या बैठकीत फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेची माहिती उपस्थित सर्व मुख्यमंत्र्यांना दिली. दुष्काळी भागात या योजनेमुळे राज्यातील सहा हजार गावांत शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे. ही मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे त्याच वेळी मी ठरवले होते की महाराष्ट्राची ही महत्त्वाकांक्षी योजना राजस्थानातही राबवायची. राजस्थानातही तीन हजार गावांत ही योजना राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.