जिल्ह्यात पक्षांचे अभयारण्य उभारण्याचा मानस-पालकमंत्री बडोले

0
7

सारस महोत्सवाचा थाटात शुभारंभ

गोंदिया,दि.२० : गोंदिया जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्घ असून जिल्ह्याच्या विविध भागात स्थलांतरीत व विदेशी पक्षांचे थवेच्या थवे दरवर्षी येत असतात. सारस महोत्सवाच्या निमित्ताने गोंदिया जिल्ह्यात पक्षांचे अभयारण्य निर्माण करण्याचा आमचा मानस असल्याचे मत सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. गोंदिया जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने हॉटेल गेटवे येथे आयोजित सारस महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
सारस संवर्धनाचा संदेश असलेले बलून आकाशात सोडून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते आज हॉटेल गेटवे येथे सारस महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त मुख्य सचिव तथा पालक सचिव पी.एस.मीना, प्रसिद्घ आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, नगराध्यक्ष कशिश जयसवाल, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे व उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सारस संवर्धनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून लोप पावत चाललेल्या सारस पक्षाचे संवर्धन करण्यासाठी गोंदिया जिल्हा पर्यटन समितीने घेतलेल्या पुढाकारास पालकमंत्री म्हणून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या समृद्घ जिल्हा असून तलावाचा जिल्हा म्हणूनही प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील विविध तलावावर दरवर्षी असंख्य स्थलांतरीत व विदेशी पक्षी येत असतात. पर्यटकांना व पक्षी अभ्यासकांचा अभ्यास व्हावा यासाठी पक्षांचे अभयारण्य उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
सारसच्या निमित्ताने जिल्ह्यात असलेल्या विविध पर्यटनस्थळांना पर्यटकांना भेटी देता यावे यासाठी पर्यटनाचे जिल्हा सर्कीट तयार करण्यात येणार आहे. सारससाठी प्रसिद्घ असलेल्या भरतपूर पेक्षाही जास्त सारस व अन्य पक्षांचे दर्शन गोंदिया जिल्ह्यात होत असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले. याचबरोबर जिल्ह्यातील नवेगावबांध, नागझिरा, श्रृंगारबांध, कचारगड, हाजराफॉल, चुलबंद, बोदलकसा यासह अन्य पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार असल्याचे बडोले यांनी सांगितले. सारसच्या निमित्ताने गोंदिया जिल्हा पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आल्याचे त्यांनी नमूद केले.

सारसच्या निमित्ताने गोंदियाला पर्यटन डेस्टीनेशन बनविण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम यांनी सांगितले. सारस संवर्धन ही कुणा एका व्यक्तीची जबाबदारी असून ती सामुहिक असल्याचे नमूद करुन शिवराम म्हणाले की, या महोत्सवाच्या माध्यमातून सारस म्हणजे गोंदिया ही ओळख देशभरातील पक्षीप्रेमींना होणार आहे. पक्षीप्रेमी छायाचित्रकारांसाठी गोंदिया अतिशय उपयुक्त व आदर्श ठिकाण असल्याचे सांगून आपण गोंदिया येथे पक्षी संवर्धन या विषयावर कार्यशाळा घेणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
सारस पक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या भरतपूर येथीलच आपण असल्याचे सांगून पालक सचिव पी.एस.मीना म्हणाले की, सारस पक्षाची ओळख आपल्याला लहानपणापासून आहे. गोंदिया हे मिनी भरतपूर असल्याचे त्यांनी सांगितले. रासायनिक खताचा व किटकनाशकांचा अतिवापर होत असल्यामुळे याचा धोका सारसला होऊन सारसची संख्या कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या भागातील शेतकèयांनी जैविक शेती करण्यावर भर दयावा असे आवाहन त्यांनी केले. गोंदियाचे मार्केटिंग मिनी भरतपूर असे करावे व यासाठी माध्यमांनी सकारात्मक सहकार्य करावे. पशुपक्षी यांचेविषयी समाजात करुणा निर्माण झाली तरच पक्षी संवर्धनाचा हेतू सफल होईल असे ते म्हणाले.

तर सारस महोत्सवाची संकल्पना व उद्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून विशद केला. पर्यटनाला चालना देण्यासाठी सारस महोत्सव उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले. गोंदियाला सारस डेस्टीनेशन म्हणून प्रमोट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सारसमुळे गोंदिया जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे. सारसबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम व उपाययोजना आखल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोस्टर स्पर्धा, वन्यजीव छायाचित्र स्पर्धा तसेच सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. सारस हा पक्षांचा राजा असल्याचा उल्लेख करुन या महोत्सवाच्या माध्यमातून सारस राज्यातील तसेच देशातील असंख्य पक्षीप्रेमी व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सारस पक्षासंबंधीच्या माहितीचे सादरीकरण सावन बहेकार यांनी केले. विवेक मंदिरच्या विद्याथ्र्यांनी पर्यावरण गीत सादर करुन उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व वन्यजीव प्रेमी मुकूंद धुर्वे यांनी केले. उपस्थितांचे आभार उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी मानले.

कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, जिल्हा कोषागार अधिकारी दिगांबर नेमाडे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिश कळमकर, वन्यजीव विभागाचे विभागीय वनअधिकारी श्री.कातोरे, गोंदिया बसस्थानकाचे आगारप्रमुख गौतम शेंडे, सामाजिक वनीकरणचे श्री. कुंभलकर, गोंदिया-तिरोडा-देवरी येथील उपविभागीय अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, वन्यजीव प्रेमी डॉ.राजेंद्र जैन, सावन बहेकार, सुनील धोटे, भरत जसानी, मुकूंद धुर्वे, रवि गोलानी, मुनेश गौतम, राजु खोडेचा, चेतन जसानी, रुपेश निबार्ते, त्र्यंबक जरोदे, अंकीत ठाकूर, अविजीत परिहार, शशांक लाडेकर, दुश्यंत रेभे, दुश्यंत आकरे, पिंटू वंजारी यासह पक्षीप्रेमी, वन्यजीव प्रेमी, छायाचित्रकार व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वन्यजीव, छायाचित्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेमध्ये सुधीर शिवराम यांनी मार्गदर्शन केले.