ग्रामीण क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य-गृहराज्यमंत्री राम शिंदे

0
7

गडचिरोली : सुरजागड लोहखनिज प्रकल्प एटापल्ली परिसरातच सुरु होणार असून, या प्रकल्पात स्थानिक रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. येथील रस्ते व इतर समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील. हेडरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात येणार असून, ग्रामीण क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देण्यात येईल येईल, अशी ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली.

तालुक्यातील हेडरी येथे नव्यानेच पोलीस मदत केंद्र निर्माण करण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन  22 डिसेंबरला गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, जिल्हाधिकारी रणजीत कुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव आदी उपस्थित होते.

याप्रसंगी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्री अंब्रीशराव आत्राम यांनी गृहराज्यमंत्र्यांना या परिसरातील समस्या अवगत केल्या. या परिसरातील नक्षल समस्या, त्यांची दहशत व लोकांचे राहणीमान, विकासाबाबत सविस्तर माहिती दिली. या परिसरातील लोकांना नक्षल्यांच्या दहशतीत जीवन जगावे लागत आहे. एकेकाळी लोकांच्या मदतीला धावून येणारे नक्षलवादी आता लोकांना मदत न करता त्यांच्यावर अत्याचार करीत असल्याचे पालकमंत्र्यांनी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना सांगितले. कार्यक्रमाला हेडरी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी वैभव देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राजपूत, प्रविण सिरसाट, रघुवीर मुरांडे, प्रफुल्ल बेहरे, पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.