वंचित समाजापर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
12


एन.के.पी.साळवे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचा सोहळा
नागपूर, दिनांक 24 – वैद्यकीय क्षेत्रात येणा-यांनी गोरगरिबांची सेवा करावयाची आहे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सेवा करावी. या क्षेत्रातील नवोदित डॉक्टरांनी ग्रामीण भागात जाऊन काम करावे व समाधान मिळवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
एन. के.पी साळवे वैद्यकीय संस्था आणि संशोधन केंद्र आणि लता मंगेशकर रूग्णालयाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते एन. के.पी साळवे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
मातोश्री सभागृहात आयोजित कार्यक्रमास अर्थ व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, कृष्णा विद्यापीठाचे कुलपती वेदप्रकाश मिश्रा, संस्थेचे अध्यक्ष रणजित देशमुख, संस्थेचे कोषाध्यक्ष तथा आमदार आशीष देशमुख, सचिव अमोल देशमुख, आमदार समीर मेघे, आमदार मिलिंद माने, भाऊसाहेब भोगे, गोपाळ दुबे आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, आरोग्य सेवा आणि सुविधा पुरविण्याचे कार्य राज्य शासनातर्फे करण्यात येते. परंतु सेवेच्या काही कमतरता भासतात. वैद्यकीय महाविद्यालयांचा विचार करताना राज्यातील सर्व जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. उच्च विद्याविभूषित असलेले एमबीबीएस पदवी प्राप्त डॉक्टर्स ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी उत्सुक नसतात. त्यांनी आपल्या उमेदीच्या काळात मातृभूमीची सेवा, आराधना करताना ध्येयवाद आणि प्रेरणेने ग्रामीण भागापर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, राज्यात मेडिकल, पॅरामेडिकल कॉलेज उघडले जावेत. डॉक्टर हा समाजातील महत्त्वाचा असा घटक असून त्यांनी ग्रामीण भागापर्यंत पोहचवून ग्रामीण भागाची सेवा करावी. 
अर्थ व नियोजन तथा वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभियंता रस्त्याचे काम करतो. त्याचे मुल्यांकन चुकले तर रस्ता, उड्डाणपुलाचे नुकसान होते. मात्र डॉक्टर मनुष्याच्या जीवनाचे मुल्यांकन करत असतो. पृथ्वीपेक्षाही मानवाची किंमत अधिक आहे. 
प्रारंभी एन.के.पी. साळवे यांच्या अर्धाकृती पुतळयाचे अनावरण मान्यवरांच्याहस्ते झाले. तसेच संस्थेचा माहितीपट यावेळी दाखविण्यात आला. संस्थेच्या 25 वर्षाच्या वाटचालीसंदर्भातील सोव्हेनिअरचे विमोचनही मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. तसेच संस्थेत कार्य करणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात रणजित देशमुख यांनी विचार मांडले. प्रास्ताविक काजल मित्रा यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. निलोफर मुजावर, डॉ. राखी आंबाडे यांनी केले.