मुल्ला येथील सरंपचाविरुद्ध अविश्वासप्रस्ताव बारगळला

0
9

देवरी- तालुक्यातील मुल्ला येथील सरपंच भोजराज काशिराम घासले यांचे विरुद्ध आणलेला अविश्वास प्रस्ताव गेल्या मंगळवारी (ता.२२) आवश्यक सदस्य संख्येअभावी बारगळला.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मुल्ला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भोजराज काशिराम घासले हे आहेत. गेल्या निवडणुकीत एकता पॅनेलच्या नऊपैकी आठ सदस्य निवडून आल्याने ते सरपंचपदी विराजमान झाले होते. मुल्ला येथील ग्रामपंचायतीत ९ सदस्य असून सरपंचपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. असे असताना उपसरपंच सीताराम मेंढे आणि इतर ६ सदस्यांनी गेल्या १६तारखेला सरपंच घासले यांचे विरुद्ध तहसीलदार देवरी यांना अविश्वासदर्शक प्रस्तावाची नोटीस दिली होती. सरपंच हे सदस्यांच्या सल्ल्याने वागत नसल्याचे कारण अविश्वासाच्या नोटिसात देण्यात आले होते. यामुळे तहसीलदार देवरी यांनी गेल्या मंगळवारी विशेष सभा आयोजित केली होती. देवरीचे तहसीलदार संजय नागतिळक हे त्या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. मात्र, सभेच्या नियोजित वेळी नऊपैकी पाच सदस्य सभागृहात हजर होते. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आवश्यक सदस्य संख्या नसल्याने तहसीलदार यांनी सदर अविश्वास ठराव फेटाळून लावल्याने सरपंच भोजराज घासले यांचे सरपंचपद हे कायम राहिले.