सुभाष बागेतील रखडलेली कामे त्वरित सुरू करा : कदम

0
17

गोंदिया : शहराच्या मध्यवस्तीमधील सुभाष बागेत प्रलंबित असलेली विकास कामे रखडली असल्याने ती त्वरित सुरू करण्याची मागणी प्रभाग क्र. ६ च्या नगरसेविका भावना कदम यांनी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले.
गोंदिया शहरात शुद्ध हवेसाठी दररोज पहाटेपासून मोठय़ा प्रमाणात नागरिक येतात. सर्व वयोगटातील महिला व पुरूषवर्गासाठी सुभाष बाग हे एकमेव गार्डन आहे. पण येथे महिला व पुरुषांसाठी शौचालय नाही, झाडांना पाणी देण्यासाठी बांधण्यात आलेली टाकी अनेक वर्षापासून बंद पडून आहे. यासाठी नवीन बोअरवेल खोदून पाण्याची टाकी सुरू करण्याची गरज आहे. हुतात्मा स्मारकाला दुरुस्तीच गरज आहे.
युवकांसाठी असलेले व्यायामाचे साहित्य तुटलेले असून नवीन साहित्यांची गरज आहे. बागेत मागील १0 वर्षांपासून माळी नाही.बागेसाठी माळीची नियुक्ती करण्याची गरज आहे.नागरिकांना बसण्यासाठी शेड व खुच्र्या नसून व्यवस्था करायची आहे.मात्र नगर परिषदेकडून या सर्व कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
या बागेत लहान्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांची गैरसोय होत आहे. ही कामे त्वरित सुरू करण्याची मागणी नगरसेविका भावना कदम यांनी केली आहे. आपल्या मागण्यांना घेवून त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.