भंडारा येथे खुली सैन्य भरती आजपासून

0
8

 भंडारा दि.६::जिल्ह्यात कधी नव्हे ती पहिल्यांदा खुली सैनिक भरती आज बुधवारपासून येथील शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होत आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या भरतीसाठी विदर्भातील १0 जिल्ह्यातून येणार आहेत. ६ ते १६ जानेवारी या कालावधीत ही सैन्य भरती होत आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी धीरजकुमार, कर्नल महेंद्रकुमार जोशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी मंगळवारला दुपारी क्रीडा संकुलाची पाहणी करून सैन्य भरती व्यवस्थेचा आढावा घेतला. 
सैन्य भरतीसाठी पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. यामध्ये विदर्भातील ४७ हजार १५५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ६ जानेवारीला पहाटे ३ वाजता वर्धा जिल्ह्यासाठी भरती प्रक्रिया सुरू होईल. भरतीसाठी सर्व उमेदवारांना बसस्थानकावर एकत्रित करून त्यानंतर एका रांगेत जिल्हा क्रीडा संकुल येथे भरती प्रक्रियेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. 

उमेदवारांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. क्रीडा संकुलाबाहेर ११६ पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून यामध्ये ६ पोलीस निरिक्षक, ११ पोलीस उपनिरिक्षक, ८0 पोलीस कर्मचारी, वाहतूक नियंत्रण शाखेचे २0 कर्मचारी तैनात करण्यात येतील. याशिवाय रेल्वे स्थानक, बसस्थानक, उमेदवारांचे राहण्याचे ठिकाणी ३0 अतिरिक्त पोलीस असा १५0 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. 

सैन्य भरतीसाठी डॉक्टरांची विशेष चमू नियुक्त करण्यात आली असून सकाळी ५.४५ पासून उमेदवारांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. सैन्य भरती कालावधीमध्ये शहरातील सैन्य भरतीच्या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही, यासाठी वीज वितरण कंपनीमार्फत विशेष दक्षता घेण्यात येत आहे.