डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार २५ जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

0
92

गोंदिया, दि.८ : सन २०१५-१६ या वर्षाकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी उत्कृष्ट समाज कार्यकर्त्यांची व सामाजिक संस्थांचे अर्ज २५ जानेवारीपर्यंत मागविण्यात येत आहेत. समाज भूषण पुरस्कारासाठी अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या समाज कार्यकर्त्यांनी व संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. समाज भूषण पुरस्कारासाठी अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती कल्याण कार्य तसेच शारीरीक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल अपंग, कुष्ठरोगी इत्यादी सामाजिक दुर्बल घटकांचे सेवा करणारे समाजसेवक असावेत. सामाजिक कल्याण क्षेत्रात त्यांनी कमीत कमी १० वर्षे कार्य केलेले असावे.
सामाजिक कार्यकर्त्याचे वय पुरुषासाठी ५० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त व स्त्रियांसाठी ४० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. यापुर्वी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज करु नये. समाज भूषण पुरस्कारासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. विहित अर्जाचा नमूना सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांचे कार्यालयात विनामूल्य मिळेल.
हया पुरस्काराकरीता उमेदवाराची निवड करतांना जात, धर्म, लिंग, क्षेत्र या बाबीचा विचार केला जाणार नाही. सामाजिक संस्थांनी पुरस्काराकरीता समाजकल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उत्थानाकरीता शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मुलन, अंधश्रध्दा, रुढी निर्मुलन, जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था असाव्यात. स्वयंसेवी संस्था पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० व सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार नोंदणीकृत असाव्यात.
अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांनी आपले प्रस्ताव कार्यालय, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया येथे २५ जानेवारी २०१६ पूर्वी पाठवावे. प्रस्तावासोबत पासपोर्ट साईजच्या २ फोटो त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती, त्यासंबंधी पुरावा दाखल कागदपत्रे व कात्रणे इत्यादी माहिती जोडावी. असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.