जिल्हा क्रीडा पुरस्कार-२०१५ करीता १५ जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

0
8

गोंदिया, दि.८ : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, मार्गदर्शक व कार्यकर्ता यांच्या कार्याचा गौरव करुन उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/कार्यकर्ता व खेळाडू (पुरुष व महिलांकरीता स्वतंत्र) यांच्याकडून दिनांक १५ जानेवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी अर्ज मागविले आहे. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात संबंधित जिल्ह्यात सलग १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे.
क्रीडा मार्गदर्शक या पुरस्काराकरीता अर्जदाराने सतत दहा वर्षे मार्गदर्शन केले असावे. वयाची ३० वर्षे पूर्ण केली असावी. सांघिक अथवा वैयक्तिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य/जिल्हा अजिंक्य स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणारे खेळाडू अर्ज करु शकतील तसेच अर्जदाराने मागील दहा वर्षात राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिलांमधील राष्ट्रीय स्तरांपर्यंत पदक विजेते किमान ३ खेळाडू तयार केलेले असावे.
क्रीडा संघटक/कार्यकर्ता या पुरस्कारासाठी अर्जदाराने दहा वर्षांपासून जिल्ह्याच्या क्रीडा विकासात योगदान दिले असावे. वयाची ३० वर्षे पूर्ण केली असावी. अर्जदाराने विशिष्ट एका अधिकृत खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी केलेल्या कार्याची माहिती सादर करावी. खेळाडू या पुरस्कारासाठी उमेदवाराने ५ वर्षांपैकी २ वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाचे प्रतिनिधीत्व केले असावे. वरिष्ठ गटातील राष्ट्रीय सुवर्णपदक, विजेत्या व आंतरराष्ट्रीय अधिकृत स्पर्धेत सहभागी खेळाडूस जिल्हा क्रीडा पुरस्कार थेट देण्यात येईल. जिल्हा क्रीडा पुरस्काराबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी कळविले आहे.