रस्ता सुरक्षा अभियान-२०१६१० जानेवारी रोजी

0
7

पालकमंत्री राजकुमार बडोलेंच्या हस्ते उदघाटन
गोंदिया, दि.८ : उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतुक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान-२०१६ दिनांक १० ते २४ जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जि.प.च्या अध्यक्ष उषाताई मेंढे व प्रमुख अतिथी म्हणून आमदार सर्वश्री राजेंद्र जैन, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, सा.बां.विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, न.प.चे नगराध्यक्ष कशिश जायसवाल व फुलचूरटोला ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती उर्मिलाताई उपस्थित राहणार आहेत.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
या अभियानाअंतर्गत टोल नाका व महत्वाच्या रहदारीच्या ठिकाणी चालक/प्रवाशांच्या जागृतीसाठी माहिती पत्रकाचे वाटप करणे, रहदारीविषयक जनजागृतीचे पोस्टर्स चिकटवणे, बॅनर लावणे, माहिती पुस्तिकांचे वाटप करणे, संकेतस्थळाची माहिती देणे, रस्ता सुरक्षा विषयावर चित्र प्रदर्शनी, शाळेतील मुलांना वाहतुकीसंबंधात माहिती देणे, वाहन चालकांसाठी रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन, स्कूलबस चालकांचे प्रशिक्षण, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून रस्ता सुरक्षाविषयी वक्तृत्व, चित्रकला, निबंध स्पर्धा, परिसंवाद, माहिती पत्रकांचे वाटप करण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभागासोबत ब्लॅकस्पॉटची दुरुस्ती करणे, फलक लावणे, धोकादायक इशाऱ्याचे फलक लावणे, रस्त्यावर पट्टे मारणे, त्याचप्रमाणे प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात येईल. १० ते २४ जानेवारी २०१६ दरम्यान या अभियानाअंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्यामध्ये वाहनांची लाईट तपासणी, नंबरप्लेट तपासणी, वाहनांची रिफ्लेक्टर तपासणी, दुचाकी वाहनांची तपासणी, हेल्मेटबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आयोजित उदघाटन व इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे व वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक के.एम.धुमाळ यांनी केले आहे.