महावितरण कार्यालयाच्या दारात चार तास ठिय्या आंदोलन

0
21

तुमसर,दि.16- शेतकर्‍यांच्या कृषिपंपाना ४ तास वीज पुरवठा होत असल्याने संतापलेल्या शेतकर्‍यांनी शुक्रवारी सिहोरा येथील महावितरणच्या कार्यालयातील दारात चार तास ठिय्या आंदोलन केले. या घेराव आंदोलनात शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतकर्‍यांच्या कृषिपंपाना नियोजित वेळेत ८ तास थ्री फेज विजेचा पुरवठय़ात कपात करण्यात येत असून फक्त ४ तास थ्री फेज विजेचा पुरवठा करण्यात येत आहेत. यातही १0 ते १२ वेळेस ब्रेकडाऊन करण्यात येत असल्याने शेतीचे ओलित होत नाही. पाण्याअभावी धानाचे पीक करपण्याच्या मार्गावर आले आहेत. धानाचे शेतीला भेगा पडल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत थ्री फेज वीज पुरवठा करण्यात येत असल्याने शेतकर्‍यांमध्ये वन्यप्राण्यांचे हल्ल्याची भीती राहत आहे. थ्री फेज वीज पुरवठय़ात भारनियमन पाळण्यात येत असल्याने रात्रभर शेतकर्‍यांना रात्र जागून काढावी लागत आहे. शेवटच्या क्षणात धानाचे पिकांना पाण्याची गरज आहे, असे असताना ८ तास थ्री फेज वीज पुरवठा करण्यात येत नाही. यामुळे, परिसरातील शेतकरी संतापले.
आज शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी यांच्या नेतृत्वात सिहोरा स्थित वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता शेकडो शेतकरी पोहोचले. कंपनीच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू केले. माजी सभापती कलाम शेख, माजी सरपंच छगणलाल पारधी, जि. प. सदस्य राजेंद्र ढबाले, पं. स. सदस्य सुभाष बोरकर, हिरालाल नागपुरे, कंचन कटरे, सरपंच गळीराम बांडेबुचे, किशोर रहांगडाले, सुखदेव राऊत, विनोद पटले, सरपंच सहादेव ढबाले, रवी बोपचे, राधेश्याम ढबाले, संतोष बघेले, रामकृष्ण बनकर, माजी सरपंच सुरेश जटाळे, गोपाल येळे, नंदलाल पटले, आलकेश ढबाले, विकास खरवडे, हेसुद्धा बसले. तब्बल चार तास शेतकर्‍यांनी दारातच ठिय्या आंदोलन केले. यानंतर शेतकर्‍यांनी कार्यलयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळासोबत उपविभागीय अभियंता अवचट हे चर्चेसाठी आले. त्यांनी वरिष्ठ अभियंताचे सोबत चर्चा केल्यानंतर शेतकर्‍यांना नियोजित वेळेत ८ तास थ्री फेज वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे लेखी आश्‍वासन दिले. यानंतरही अघोषित भारनियमन केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना सांगितले