भंडारा येथे जादुटोणा विरोधी जन प्रबोधन यात्रेचे १८ एप्रिल रोजी आगमन

0
21

भंडारा,दि.16ः – क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि महामानव विश्वरत्न बोधीसत्व प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त भडारा येथिल त्रिमुर्ती चौक डाॅ.आंबेडकर पुतळ्याजवळ जनप्रबोधन यात्रेचे आयोजन १८ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता व वैशालीनगर येथे सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे.
15 एप्रिल ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत वर्धा,वरोरा,भद्रावती,चंद्रपूर,मूल, गडचिरोली,ब्रम्हपुरी,नागभीड, गोंदिया, भंडारा, रामटेक व परत नागपूर अशी चार दिवसीय जादुटोणा विरोधी जनप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही जनप्रबोधन यात्रा दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वा पवित्र दीक्षाभूमी नागपूर येथुन विश्वरत्न महामानव, पं. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आरंभ करण्यात आली.वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया व भंडारा या पुर्व विदर्भाचा त्रिदिवशीय दौरा करुन दि.18.04.2022 ला नागपूर येथे सायंकाळी समारोप होणार आहे.
जनप्रबोधन यात्रे दरम्यान महाराष्ट्र अंनिस जागोजागी थांबुन तिथल्या स्थानिक जनतेला पंचसूत्री कार्यक्रमाचे माध्यमातून प्रबोधन करणार आहे.ज्यामध्ये सामान्य जनतेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे,समाजाची दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धा, फसवणूक व शोषण करणारी बुवाबाजी यापासुन जनतेला सावध करणे,धार्मिक अनिष्ट प्रथा,परंपरा,जीर्ण रुढी, यांची सद्वविवेक बुद्धी ने चिकित्सा करायला लावणे,समविचारी समाजपरीवर्तनाच्या संघटना व चळवळी ला तसेच विवेकी संत वांड्मयाचा व शिकवणीचा पुरस्कार करणे,भारतीय राज्यघटनेचे मुल्य संवर्धन करणे,जनतेच्या मनातून अंधश्रद्धा समुळ नष्ट करणेसाठी बुवाबाजी व झाडफुक एक थोतांड असुन त्याचा भांडाफोड नाट्यरुपाने समजाऊन सांगणे,हातचलाखी , बुवाबाजी व भानामती चे प्रयोग सादर करुन त्यामागील विज्ञान जनतेसमोर आणणे,शकुन अपशकून, शुभ अशुभ,वार तिथी मुहूर्त, होम हवन, मंत्र तंत्र , गंडेदोरे यापासुन अलिप्त रहाणेसाठी प्रबोधनाद्वारे मस्तिष्क प्रज्वलित करणे,या नंतर ही शोषणाला जर कुणी बळी पडत असल्यास ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष ,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013’ प्रमाणे शिक्षेची तरतूद करणे ,ह्या कायद्याची तंतोतंत माहिती व पुस्तकें देऊन जनतेला जागृत करणे, या कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांची तरतूद जनतेपुढे विश्लेषण करणे,जादुटोणा विरोधी कायद्याची चित्रमय पोस्टर्स कार्यक्रम स्थळी प्रदर्शित करुन जनतेत जागृती निर्माण करणे,तसेच या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस विभागाला सर्वोतोपरी व यथोचित मदत करणे,अशा विवीध माध्यमांतून जनसामान्यांना जागृत करणे साठी व अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी समिती ने हा संकल्प करुन जादुटोणा विरोधी कायद्याची जनप्रबोधन यात्रेचे आयोजन केले आहे.

सदर जनप्रबोधन यात्राचे आयोजक महा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर कार्यकारिणी व उत्तर नागपूर शाखा यांनी केले आहे.प्रबोधन यात्रेत रामभाऊ डोंगरे राज्य कार्यकारिणी सदस्य, चित्तरंजन चौरे -कार्याध्यक्ष नागपूर जिल्हा, देवानंद बडगे – कार्याध्यक्ष शाखा उत्तर नागपूर,आनंद मेश्राम . प्रधान सचिव उत्तर नागपूर,चंद्रशेखर मेश्राम – जिल्हा पदाधिकारी विजयकांत पानबुडे – निवृत्त कामगार आयुक्त,रॉकी घुटके ,अजय रहाटे,आशुतोष टेंभुर्ने,निकी ,श्वेता पाटील, माधुरी मेश्राम,सम्मेक मेश्राम,जानवी मेश्राम,यांचा सहभाग राहणार आहे. जनप्रबोधन यात्रेतील कार्यक्रमात नियोजित स्थळी शाळेतील विद्यार्थी,महाविद्यालयतील रासेयो स्वंयसेवक,शिक्षक,प्राध्यापक व प्रबुध्द नागरीकांनी जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजक प्रा.बबन मेश्राम,सामाजिक कार्यकर्ता आतिश बागडे,डाॅ.आंबेडकर पुतळा समिती अध्यक्ष वसंत हुमणे,हर्षल मेश्राम,कवियत्री अस्मिता मेश्राम,भिक्षुनी सुप्रज्ञा,एड.सरला बोरकर,सुलभा मेश्राम सह महाराष्ट्र अंनिस कार्यकर्ते यांनी केले आहे.