१८ जानेवारीला ओबीसींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
5

गडचिरोली, दि १४: ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात १८ जानेवारीला गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

यांसदर्भात ओबीसी संघर्ष कृती समितीचे संयोजक अरुण मुनघाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरुन ६ टक्के करण्यात आल्याने हा समाज आधीच अडचणीत आला आहे. त्यानंतर राज्यपालांनी काढलेल्या अधिसूचनेमुळे ओबीसी उमेदवार नोकरभरतीतून बाद झाले असून, त्यांच्यावर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. या प्रमुख मागण्यांसह अन्य २४ मागण्यांसाठी जिल्हा बंद व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १६ जानेवारी रोजी गडचिरोलीवगळता अकराही तालुक्यांमध्ये बाजारपेठ व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील. १८ जानेवारी रोजी गडचिरोली येथील शाळा-महाविद्यालये व बाजारपेठ बंद ठेवण्यात येतील. याच दिवशी सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चाला ओबीसी समाज संघटना, राष्ट्रीय घुमंतु महासंघ, सुशिक्षित ओबीसी बेरोजगार संघटना, सोनार, माळी, तेली, कुणबी, बंजारा, बेलदार, जैन कलार, गानली, सुतार, लोहार, कुंभार, परीट, नाव्ही व भोई समाज संघटना, ओबीसी कर्मचारी असोसिएशन, मराठा सेवा संघ आदींनी पाठिंबा दर्शविल्याची माहितही अरुण मुनघाटे यांनी दिली.

पत्रकार परिषदेला प्रा.शेषराव येलेकर, प्रा.राजेश कात्रटवार, प्रभाकर वासेकर, दादाजी चाफले, पांडुरंग घोटेकर, रमेश मडावी, प्रा.रमेश चौधरी, महेंद्र ब्राम्हणवाडे, रवींद्र वासेकर, रजनिकांत मोटघरे, विवेक ब्राम्हणवाडे, गुरुदेव भोपये, बाबूराव बावणे, गोवर्धन चव्हाण, नंदू कायरकर, भास्कर बुरे, आशिष पिपरे उपस्थित होते.