धापेवाडा प्रकल्पाचे पाणी १000 हेक्टरला मिळणार – आ.रहांगडाले

0
7

तिरोडा,दि.१५ : धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी रबी पिकांना मिळण्याकरीता धापेवाडा सिंचन प्रकल्प कार्यालयात आ.विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली. ३ लाख १५ हजार रुपयांचे विद्युत देयक प्रलंबित असल्यामुळे रबीला पाणी देण्याकरिता अधिकार्‍यांनी अडचण दर्शविली. पण आ.रहांगडाले यांच्या पुढाकाराने ही अडचण दूर करण्यात आली.
महावितरणच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून धापेवाडा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित न करता शेतकर्‍यांना पाणी देण्याचे आश्‍वासन महावितरणने दिले. उपस्थित शेतकर्‍यांनी सभेत त्यांच्याकडे असलेली पाणीपट्टीची रक्कम जमा करण्याबाबत हमी दिली व त्यामधून उर्वरीत वीज बिल भरण्यात येईल, असे ठरविण्यात आले.
धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे अंदाजे ९0लक्ष रुपये थकीत असल्यामुळे वीज बिल भरणे अशक्य असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांशी समन्वय साधावा व शेतकर्‍यांनी पाणी पट्टीची असलेली थकबाकी भरुन योजना सुरळीत चालविण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन आ.विजय रहांगडाले यांनी केले.