गवर्रा येथे जनजागरण मेळाव्याची सांगता

0
15

केशोरी दि.१५: नक्षलवादी हे ग्रामीण लोकांच्या विकासगंगेतील अडथळे असून ते जनसामान्यांना भूलथापा देतात. शासकीय लाभांच्या योजनापासून लोकांना दूर ठेवण्याच्या प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच जनजागरण या शब्दाची निर्मिती झाली. जनजागरणाच्या माध्यमातून लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस ठाण्याच्या वतीने गवर्रा येथील मैदानावर आयोजित जनजागरण मेळाव्यात डॉ.पखाले अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
मेळाव्याचे उद््घाटन मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी तहसीलदार कल्याणकुमार डहाट, नायब तहसीलदार सचिन पाटील, गावडे, खंडविकास अधिकारी नारायण जमईवार, कृषी अधिकारी तुमडाम, रामटेके, एकात्मिक बालविकास अधिकारी सुमिता दमाहे, प्रदीप कश्यप, डॉ. पिंकू मंडल, नक्षलसेल पोलीस निरीक्षक तटकरे, पोलीस उपनिरीक्षक शेख प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी आपल्या पथकासह उपस्थित राहून स्टॉल्सच्या माध्यमातून नक्षलविरोधी पत्रके वाटप करून नक्षल आत्मसर्मपण योजनांची माहिती दिली.
यात दोन दिवस कबड्डी स्पर्धा, १00मीटर धावणे, संगीत खुर्ची, चमना गोळी, रांगोळी स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.प्राविण्यप्राप्त करणार्‍या सर्व वयोगटातील स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले. मेळाव्याप्रसंगी आरोग्य विभागाद्वारे जननी सुरक्षा योजनेंतर्गत नऊ लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. थेल्स पी योजनेंतर्गत दोन इंजिन संच तथा बैलजोडी अनुदानापायी दोन लाभार्थ्यांना प्रत्येकी ३0 हजार रुपये प्रदान करण्यात आले. अनुसूचित जाती जमातीच्या ४९ व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.नऊ व्यक्तींना अधिवास प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तर ४४व्यक्तींना आधारकार्ड नोंदणी करून वाटप करण्यात आले. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र गोंदियाकडून २३ बेरोजगार युवकांची व्यवसाय प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.
संचालन अनिल लाडे यांनी केले. आभार सहायक पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे यांनी मानले. मेळाव्यासाठी ठाणेदार प्रशांत भस्मे, सहायक पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे, संदीप गोसावी, गणेश नावकार, एओपी प्रभारी गोरक्ष खरड, प्रकाश कांबळे तथा पोलीस कर्मचार्‍यांसह गवर्रा गार्डनपूर येथील नागरिकांनी सहकार्य केले.