एसडीओ मारहाण प्रकरणाचा तपास चुकीच्या अधिकाऱ्याकंडे;आ. नरेंद्र भोंडेकर यांचा आरोप

0
68
smart

**तर पालकमंत्र्यांचा निषेध व आंदोलन
*अवैध वसुली करणारा छोटा एसपी कोण?
दे . लोकजन वृत्तसेवा
भंडारा : – जिल्हयात सध्या पोलीस विभागाचा जो प्रकार सुरू आहे, तो लाजीरवाना आहे. फक्त वसुली हाच प्रकार पोलीस विभागात सुरु आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. गुन्हेगारांना संरक्षण मिळत आहे, तर फिर्यादीला आरोपी करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील पोलीस विभागच अपंग झाला आहे. गुन्हेगारात पोलिसांचा कोणताही धाक राहिला नाही, असा आरोप भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज विश्रामगृह भंडारा येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत केला आहे.
आ. नरेंद्र भोंडेकर पुढे म्हणाले, दोन दिवसापूर्वी पवनी तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र राठोड व एपीआय राऊत यांच्यावर दंडा, लोखंडी रॉड व फावड्याने हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणाचा शिवसेना निषेध करीत आहे. विद्यमान पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांच्यामुळे सामान्य नागरीकांचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे. फक्त वसुली हेच त्यांचे एकमेव धोरण आहे. यासाठी खास बोरकर नामक एका पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. बोरकर यांनी मान्य केल्याशिवाय जिल्हयात कोणतेही अवैध धंदे सुरु करता येत नाही. यामुळे पोलिस विभागात त्याला छोटा एसपी म्हणून ओळखल्या जात आहे. पत्रपरिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश पुर्वे, विधानसभा संपर्क प्रमुख अजयसिंग राजपूत यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
* जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली का नाही?*
वर्षाभरापासून पोलीस अधिक्षकांचा जो कारभार सुरु आहे, त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी आपण तत्कालीण गृहमंत्री अनिल देशमुख, सध्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली. दोनदा त्यांच्या बदलीची फाईल गेली. पण ती फाईल थांबली. पोलीस अधिक्षकांची बदली थांबविणारा तो नेता कोण, हे लवकरच उघडकीस आणणार असल्याचेही आ. भोंडेकर म्हणाले.

*गायकवाड यांचेकडे तपास कसा?*
पवनी तालुक्यात उपविभागीय अधिकारी राठोड, एपीआय राऊत यांच्यावर जो हल्ला झाला, तो याच प्रकरणातून झाला. पवनीचे ठाणेदार गायकवाड हे आपल्या पोलीस स्टेशनमध्ये माफियांसोबत चाय पितात. चार दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासोबत एका तहसीलदारासमोर तलाठ्याला शिवीगाळ करण्यात आली. पण गायकवाड काहीही बोलले नाही राठोड, राऊत यांचा हल्ल्यात जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण राहणार होते? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींसोबत गायकवाड यांचे संबंध आहे. आरोपीला पकडण्यासाठी जाणारे पोलिसच आरोपी सोबत जेवण करतात. असे असतांनाही राठोड, राऊत यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाचा तपास गायकवाड यांचेकडे कसा देण्यात आला? असेही आ. भोंडेकर म्हणाले. गायकवाड यांना तात्काळ निलंबीत करून या प्रकरणाचा तपास नव्या अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा व प्रकरणाची फेरतपासणी करण्यात यावी. हल्लेखोरांवर कारवाई झालीच पाहिजे, असेही आ . नरेंद्र भोंडेकर म्हणाले.

* बदली झाली नाही तर पालकमंत्र्यांचा निषेध व आंदोलन*
आम्ही महाविकास आघाडीचा घटक असलो तरी सामान्य जनतेवर अन्याय होत असेल तर आम्ही आंदोलन करण्यास तयार आहोत. २ तारेखपर्यंत जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, छोटा एसीपी बोरकर व पवनीचे ठाणेदार गायकवाड यांची बदली करण्यात आली नाही तर मंगळवारला आम्ही पालकमंत्र्यांचा निषेध करून आंदोलन करु. एवढी मोठी घटना घडूनही पालकमंत्री शांत कसे? पालकमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षियांनी एकत्र यावे, असेही आ. नरेंद्र भोंडेकर म्हणाले. गुन्हेगारांना वठणीवर आणेल, अशा पोलीस अधिक्षकांची जिल्ह्यात गरज असल्याचेही ते म्हणाले.