आदिवासींचा राजकीय दबाव निर्माण होणे आवश्यक: डॉ.नीलकांत कुलसंगे

0
16

गडचिरोली, दि. १६: आदिवासींचे राजकीय नेते आज विविध पक्षांमध्ये विखुरले आहेत. हे नेते आदिवासींचे नव्हे, तर त्या-त्या पक्षांचे नेते म्हणून वावरत असतात. अशावेळी आदिवासी समाजाने स्वत: आपला राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुप्रसिद्ध नाटयदिग्दर्शक डॉ.नीलकांत कुलसंगे यांनी  येथे केले.

पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व माजी आमदार दिवंगत नेताजी राजगडकर यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील गोंडवन कला दालनात “आदिवासींची स्थिती व आव्हाने” या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी माजी आमदार हिरामण वरखडे, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती अंजली नेताजी राजगडकर उपस्थित होत्या. डॉ.कुलसंगे पुढे म्हणाले, राज्यात ४७ प्रकारचे आदिवासी आहेत. प्रत्येकाचे रितीरिवाज वेगळे आहेत. प्रत्येक जण संघर्ष करीत आहेत. परंतु सर्वांनी एकत्रितरित्या संघर्ष करणे गरजेचे आहे. आदिवासींची सध्याची स्थिती बघता आता क्रांती करणे हाच पर्याय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नेताजी राजगडकर यांनी समाजाच्या स्थितीचे अचूक अंदाज बांधले. समविचारी मंडळींना घेऊन त्यांनी अनेक ठिकाणी साहित्य संमेलने घेतली. त्यांच्या विचार व कार्याचा आवाका मोठा होता. नेताजींनी आपली भूमिका व विचार यात तफावत येऊ दिली नाही, अशा शब्दात डॉ.कुलसंगे यांनी नेताजींना आदरांजली वाहिली. माजी आमदार हिरामण वरखडे म्हणाले की, अजूनही आपली प्रशासकीय व्यवस्था ब्रिटिशांच्या व्यवस्थेचा अंग बनून राहत आहे. अनेक कायदे ब्रिटिशांचेच असून, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असेलेले खरे कायदे लागू केले जात नाही. आदिवासींच्या संपूर्ण कल्याणासाठी त्यांना सर्वंकष बळकट करणे गरजेचे आहे, असेही श्री.वरखडे म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र मरसकोल्हे, तर प्रास्ताविक प्रभू राजगडकर यांनी केले.