ओबीसींच्या प्रश्नांवर गडचिरोली जिल्ह्यात कडकडीत बंद

0
5

गडचिरोली,  दि.१६:ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष कृती समितीने आज पुकारलेल्या जिल्हाबंद आंदोलनाला बहुतांश तालुक्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांश तालुक्यांमध्ये ओबीसी नागरिकांनी शाळा, महाविद्यालये व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली.

 ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरुन ६ टक्के करण्यात आल्याने हा समाज आधीच अडचणीत आला आहे. त्यानंतर राज्यपालांनी काढलेल्या अधिसूचनेमुळे ओबीसी उमेदवार नोकरभरतीतून बाद झाले असून, त्यांच्यावर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. आरक्षण पूर्व्रवत करावे व अधिसूचनेत सुधारणा करावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य २४ मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समितीने आज अकरा तालुक्यांमध्ये बंदचे आवाहन केले होते. आज चामोर्शी,  आरमोरी, देसाईगंज,  धानोरा, कोरची, भामरागड इत्यादी तालुक्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. चामोर्शी येथे नगर परिषद उपाध्यक्ष राहुल नैताम, विलास बुरे, आशिष पिपरे आदींच्या नेतृत्वात कडकडीत बंद पाळण्यात आला. आरमोरी येथे पंकज खरवडे, भारत बावनथडे, नंदू नाकतोडे आदींच्या नेतृत्वात बाजारपेठ व शाळा बंद ठेवण्यात आल्या. धानोरा येथे राजू मोहुर्ले, महादेव गणोरकर, नाना पाल, रोहन ठाकरे आदींनी बाजारपेठ व शाळा बंद ठेवल्या. देसाईगंज येथेही बंद पाळण्यात आला. याशिवाय कोरची, भामरागड येथेही बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले.