बालकांचे अपंगत्व टाळण्यासाठी लसीकरण मोहिम उपयुक्त- आ.अग्रवाल

0
6

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
गोंदिया दि.१७ : देशातून पोलिओचे समुळ उच्चाटन होणे गरजेचे आहे. पोलिओमुळे बालकाला अपंगत्व येते. बालकांचे अपंगत्व टाळण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहिम अत्यंत उपयुक्त आहे. असे मत राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.
आज (ता.१७) बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालय येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आ.अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीष कळमकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके यांची उपस्थिती होती.
स्वच्छ भारत सोबतच स्वस्थ भारताकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगून आ.अग्रवाल म्हणाले, आज अनेक नागरिक आरोग्यविषयक सुविधांचा लाभ घेत असल्याचे दिसून येते. पोलिओ निर्मुलनात लोकांचा जास्तीत जास्त सहभाग असणे गरजेचे असून त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता त्यांनी विशद केली.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, सुदृढ पिढी जन्माला यावी व बालकांमध्ये अपंगत्व येऊ नये यासाठी राष्ट्राच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. जिल्ह्यातील कोणताही ० ते ५ वयोगटातील बालक हा पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल. असेही डॉ.सूर्यवंशी म्हणाले.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोज पाजण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी धकाते यांनी केले. सुत्रसंचालन रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीष कळमकर यांनी मानले.