गडचिरोली जिल्हा विकासात अग्रेसर राहील- राजे अंब्रीशराव आत्राम 

0
13


* युवकांना रोजगारसंधी मिळवून देणार 
गडचिरोली,26:- गडचिरोली जिल्हयात येणाऱ्या काळात मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यासाठी प्रयत्न करण्यासोबतच जिल्हा विकासात अग्रेसर राहील यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहील व जिल्हा सर्वात पुढे राहील असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी आज प्रजासत्ताक दिनी केले. 
येथील पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानांवर मुख्य शासकीय सोहळा झाला. पालकमंत्री राजे अंब्रीशराव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर पोलिस दल तसेच गृहरक्षक दल यांची सलामी त्यांनी स्विकारली. 
या मुख्य शासकीय सोहळयास जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी रणजीत कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
आदिवासी विकास विभागाकडून शासकिय/ अनुदानित आश्रम शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, एकलव्य निवासी शाळा, व शासकीय मुला/ मुलींचे वसतीगृह येथील विद्यार्थ्यांच्या विविध अडचणीचे त्वरीत निराकरण करण्याचे उद्देशाने दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पासुन १८००-२६७-०००७ हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना त्यांची काही तक्रार नोंदवावयाची असल्यास वर दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यावर रितसर याची तक्रार संगणकामध्ये नोंदविल्या जाऊन संबंधित विभागाकडे ती तक्रार वर्ग केल्या जाईल. जो पर्यंत तक्रारींचे निराकरण होणार नाही तोपर्यंत ती समस्या संगणकामधून मिटविली जाणार नाही. असेही त्यांनी  सांगितले.
आपला हा जिल्हा आदिवासी बहुल असला तरी बदललेला “डिजिटल इंडिया ” ला साजेसे शैक्षणिक वातावरण आदिवासी आश्रम शाळेमध्ये राहील याची खबरदारी शाळा घेईल. हा दर्जा आणि दर्जेदार शिक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते शिक्षक आणि जबाबदार अधिकारी कायम राखतील अशी अपेक्षा राजे अंब्रीशराव यांनी यावेळी व्यक्त केली.