जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- पालकमंत्री  बडोले

0
10

६६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गोंदिया,दि.२६ : जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपले जीवनमान उंचावण्यासाठी आता नगदी पिकांची कास धरली पाहिजे. जिल्ह्यात दर्जेदार आरोग्यसेवा, रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी व सर्व मुलभूत सोयी सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासोबतच बचतगटातील महिलांना सक्षमतेने जीवन जगता यावे याकरीता विविध योजनांची प्रभावी व नियोजनबद्ध अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस कवायत मैदान येथे संपन्न झाला. राष्ट्रध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आ.डॉ.खुशाल बोपचे, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नैसर्गीकदृष्ट्या संपन्न गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकास व त्यातून रोजगार क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यातील ११ पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ४८ कोटी ४४ लक्ष रुपयांच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आली असून नवेगावबांध पर्यटनस्थळाच्या विकासाकरीता राज्य शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यात सारस महोत्सवाचे आयोजन करुन सारस संरक्षण व संवर्धनाची लोकचळवळ जिल्हा प्रशासनाने उभी केल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात २०१५-१६ यावर्षात ७६ हजार ५७९ कुटुंबांना १०० दिवस रोजगार देण्यात आला.जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे असे सांगून यात सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी गावकरी व शासकीय यंत्रणांना केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला. ध्वजनिधी संकलनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना व जिल्हा सैनिक कल्याणचे सुबेदार मेजर जगदिश रंगारी यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवान्वित करण्यात आले. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी नरेश रहिले यांना  व संतोष शर्मा यांना पुरस्काराचे धनादेश बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. जि.प.चे(सामान्य प्रशासन) वाहनचालक एच.बी.हेमने यांनी जिवाची पर्वा न करता अपघातस्थळी वाहनचालकाला मदत केली त्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. राष्ट्रीय स्तरावरील हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम आलेल्या वनश्री बडवाईक विद्यार्थीनीचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. बंधू शिक्षण प्रसारक मंडळ गोंदिया यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय अहेर, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पोलीस परेडचे संचलन परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी केले. परेडमध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, एन.सी.सी., स्काऊट, पोलीस बँड पथक यांनी सहभाग घेतला. यावेळी समता संदेश रथ, मिशन इंद्रधनुष्य चित्ररथ, सर्व शिक्षा अभियान, सामाजिक वनीकरण, अग्नीशमन दल, श्वान पथक यांनी सहभाग घेतला. यानंतर विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.