नाथजोगींच्या भविष्यासाठी मदत करणार – डॉ. विजय सूर्यवंशी

0
7

अदासीत आरोग्य तपासणी शिबीर
ङ्घ नाथजोगींना मिळणार घरकूल

गोंदिया,दि. १८ : अनेकांचे राशी भविष्य पाहून आपला उदरनिर्वाह करणारा नाथजोगी समाज आज अनेक सोयीसुविधा व योजनांपासून वंचित आहे. या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चित मदत करण्यात येईल. अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
अदासी येथील आयुर्वेदिक शासकीय दवाखान्यात आयोजित आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटक म्हणून डॉ. सूर्यवंशी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीष क्ळमकर, अदासी सरपंच निर्मला बहेकार, माजी जिल्हा परिषद सदस्य जगदिश बहेकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, नाथजोगी समाजाच्या वस्तीसाठी कर्मचारी समन्वय समितीने केलेले कार्य निश्चितच अभिमानास्पद आहे. या समाजासाठी जन्म दाखले तयार करण्यात आले. सध्या कापडी तंबूत या समाजातील कुटूंब मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. त्यांना कायमचे घरकूल देण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून येत्या ६ ते ८ महिन्यात घरकूल देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
सर्व यंत्रणा या समाजाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, पशूधन विकास विभागाच्या वतीने त्यांना शेळ्या-मेंढ्याच्या गटाचा पुरवठा करण्यात येईल. महिलांना कुटीर उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येईल. या समाजातील मुलांना स्वबळावर उभे करण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
.अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे संस्थापक समाजकल्याण विभागाच्या जातपडताळणी समितीचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त अनिल देशमुख यांनी आपल्या मनोगतातून समितीने नाथजोगी समाजाच्या कल्याणासाठी आजपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमाची व समितीने केलेल्या विविध समाजपयोगी कार्याची माहिती दिली.प्रास्ताविकातून अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे यांनी नाथजोगी समाजाच्या प्रगतीसाठी करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली.यावेळी आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात अदासी येथील ग्रामस्थ तसेच नाथजोगी महिला भगिनी यांनी आपला सहभाग नोदंविला व आरोग्य तपासणी केली.कार्यक्रमाला जीवन लंजे, लिलाधर पाथोडे, तहसिलदार संजय पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, डॉ. रहांगडाले, श्री भरणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष तांबू यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी मानले.