जिल्हा दक्षता समिती बैठकीत अर्थ सहाय्याची सहा प्रकरण मंजुर

0
24

गोंदिया, दि.30 : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी अर्थ सहाय्याची सहा प्रकरण मंजूर केली. ज्या प्रकरणांमध्ये जात प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा प्रकरणांमधील जात प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले.

             सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, गोंदिया यांचेद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभा कक्षात जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समिती व जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी विषयवार सविस्तर चर्चा करण्यात आली.

            बैठकीदरम्यान जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त, समाजकल्याण, विनोद मोहतुरे यांनी माहे ऑगस्ट 2022 अखेर पोलीस विभागाकडून प्राप्त एकूण गुन्हे, पोलीस तपासावरील गुन्हे, पोलीस फायनल गुन्हे, न्यायालयात प्रलंबित गुन्हे व अर्थसहाय्याकरिता प्रलंबित गुन्हे याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी याबाबत सविस्तर आढावा घेतला.

             यावेळी जिल्हाधिकारी यांनी अर्थसहाय्याच्या 6 प्रकरणांना मंजुरी दिली. ज्या प्रकरणांमध्ये जात प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा प्रकरणांमधील जात प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. तसेच जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीची सभाही घेण्यात आली. यावेळी विनोद मोहतुरे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले कायदे व शासन निर्णय याबाबत सविस्तर माहिती दिली. दरम्यान राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 ची अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.

            दरम्यान प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर यांनी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित बाबींवरील मुद्ये उपस्थित केले. सदर मुद्यांवर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष नारायणप्रसाद जमईवार यांनी ज्येष्ठ नागरिकांना विविध ठिकाणी जाणवत असलेल्या समस्या मांडल्या. समस्यांवर काही उपाययोजना सूचवून त्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना विनंती केली. यावर सविस्तर चर्चा करून सदर समस्या सोडविण्यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले.

              बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा समाजकल्याण अधिकारी संजय गणवीर, प्रशासनिक अधिकारी, नगरपरिषद सी.ए.राणे, सहायक प्रकल्प अधिकारी श्रीमती रमा मिश्रा, ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य नारायणप्रसाद जमईवार व दुलीचंद बुद्धे उपस्थित होते.