ज्येष्ठ नागरिकांनी तरुण पिढीवर संस्कार व समाजसेवेची बीज रूजवावे- समाजभूषण सु.ना.खंडारे

0
14
सेवा पंधरवडा व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा ‘संवाद’
वाशिम,दि.१-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वाशिम आणि जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडा अंतर्गत जेष्ठ नागरिक दिनानिमित्त जेष्ठ नागरिकांसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे आज १ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले.
          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजभूषण पुरस्काराचे मानकरी सु. ना. खंडारे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक महासंघ वाशिमचे अध्यक्ष परसराम जाधव,श्री.सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. श्रीमती संधानी,ज्येष्ठ नागरिक रामपाल मंत्री,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक जगदीश गाभणे, प्रकाश उत्तम गवळीकर व श्रीमती वनमाला पेंढारकर , शाहीर संतोष खडसे, अविनाश कांबळे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष पी.एस. खंडारे,क्षितीज फाऊंडेशन वाशिमचे समन्वय अतुल पाटील, जेष्ठ नागरिक हेल्प लाईनचे समन्वयक ज्ञानेश्वर टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
      कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाज सुधारक शाहू, फुले,आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन,दीप प्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.वाठ यांनी केले. यावेळी त्यांनी सेवा पंधरवडा व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उपस्थितांना आयोजित कार्यक्रमात माहिती दिली. जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमास उपस्थित जेष्ठ नागरिकांना पुष्प देवून स्वागत करण्यात आले. तसेच जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत संघटना यांचा प्रोत्साहनपर सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्ह्यातील उपस्थित ८० वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना लोकशाही प्रक्रियेमध्ये दिलेल्या सहभागाबद्दल मा. मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्रे प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले.
     श्री.पाटील यांनी ज्येष्ठनागरिकांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.श्रीमती पेंढारकर यांनी वृद्धांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.श्री.जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रित केल्याबद्दल आभार मानून वृद्धापकाळात ज्येष्ठ नागरिकांना भावनिक आधाराची गरज असल्याचे सांगून मुलांनी आपल्या जेष्ठ आई वडीलांची सेवा केली पाहिजे असे सांगितले. तसेच प्रत्येक तालुक्यात जेष्ठांचा एकसंघ करण्याचे आवाहन केले.प्रा.श्रीमती संधानी यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आनंदी जीवन जगण्याचे आवाहन केले.श्री.खंडारे यांनी आई वडील हेच दैवत असून त्यांची सेवा हेच आपले कर्तव्य असल्याचे सांगून वृद्धाश्रम ही संकल्पना नष्ट झाली पाहिजे असे आवाहन केले. श्री. टेकाडे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन क्र. १४५६७ असल्याचे सांगून माहिती, मार्गदर्शन,भावनिक आधार व प्रत्यक्ष मदत यांद्वारे त्यांची फाऊंडेशन मदत करते असे सांगितले व ज्यांना गरज असेल त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले. शाहीर श्री. खडसे यांनी ज्येष्ठ नागरिकांबाबत गीतामधून विचार व्यक्त केले.
       अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.खडसे यांनी संस्कारशील तरुणांची गरज असल्याचे सांगून आपण. आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले तर ज्येष्ठ नागरिकांचा ते सन्मान व आदर करतील तसेच प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या छंदाची व विरंगुळयाची जोपासना केली पाहिजे. आपल्या आजारांवर वेळीच उपचार केला पाहिजे असे आवाहन केले.
     कार्यक्रमाचे संचालन प्रा. हिवसे यांनी केले.आभार श्री.शिरभाते यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी,शासकीय वसतीगृहाचे गृहपाल,महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी, ब्रिक्स व क्रिस्टल कंपनीचे सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.