हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यास तातडीने शासकीय अनुदान द्या-पालकमंत्री

0
52

हत्तींना परत पाठविण्याची उपाययोजना करा
हत्तींच्या हल्ल्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू एक जखमी
गोंदिया- गोंदिया वनविभागा अंतर्गत नवेगांवबांध वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र जब्बारटोला मधील कक्ष क्रमांक १९७ चे राखीव वनात झाशी नगर उपसा सिंचनच्या कालव्या शेजारी ०४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७ वा. वन्यप्राणी हत्तींचे हल्ल्यात मौजा तिडका येथील जोहरु पोरेटी हे किरकोळ जखमी झाले असून सुरेंद्र जेटू कढईबाघ, वय ५२ वर्षे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे तातडीने अनुदान देण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
मौजा तिडका गावातील अंदाजे २० ते २५ लोकांचा जमाव हत्तीच्या कळपाने शेतीचे नुकसान करु नये या करीता ०३ ऑक्टोबर २०२२ पासून हत्तींच्या कळपाचा पाठलाग, आरडा-ओरडा, डफरी, फटाके वाजवून करीत होते. त्यामुळे चिडलेल्या हत्तींनी इसमावर हल्ला करुन त्यास ठार मारल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे.
या घटनेची त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे तातडीने अनुदान वितरित करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातील हत्तीचे कळप परत पाठविण्याची उपाययोजना करावी असे निर्देशही पालकमंत्र्यांनी वन विभागाला दिले.
हत्तींचा कळप नवेगांव राष्ट्रीय उद्यानाचे दिशेने मार्गक्रमण करीत असतांना, नवेगांव राष्ट्रीय उद्यानाच्या सिमेवरील।चुटीया गावातील ग्रामस्थांनी हत्तींना दुस-या दिशेने पळवून लावले. परिणामी हत्तींचा कळप पुनःश्च तिडका गावाच्या दिशेने वळला. बिथरलेला हत्तींचा कळप जब्बारखेडा बिटाच्या कक्ष क्रमांक १९७ चे राखीव वनात फिरत होता. सदर क्षेत्र तिडका गावालगत असून हत्तींच्या कळपाने शेतात येवू नये याकरीता तिडका गावातील २० ते २५ लोकांचा गट हत्तींना जंगलामध्ये पळवून लावण्या करीता त्यांनी जंगलामध्ये हत्तींच्या मागे अंदाजे तिन किलोमिटर अंतरापर्यंत पाठलाग करुन हत्तींच्या कळपाला हाकलून लावले.
या दरम्यान झाशी नगर उपसा सिंचनाचे कॅनल जवळ कक्ष क्रमांक १९१ (राखीव वन) जब्बारखेडा बिटामध्ये सदर घटना घडलेली आहे. स्थानिक वन कर्मचारी यांचेकडुन ग्रामस्थांना वेळो-वेळी सुचना देण्यात आल्या होत्या. २४ सप्टेंबर, २०२२ रोजी गोंदिया वन विभागाचे हददीमध्ये हत्तींच्या कळपाने प्रवेश केल्यापासून सर्व गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वन विभागाकडुन जनजागृती केली जात आहे. वनविभागाचे ६० ते ७० कर्मचारी दिवस-रात्र हत्तींचे सनियंत्रण करीत आहेत. तसेच झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्याचे प्रयत्न सुध्दा केले जात आहेत.
सदर प्रकरणाचा सखोल तापास करुन तातडीने मृत झालेल्या इसमाचे कुटूंबीयांना शासन निर्णयानुसार वनविभागाकडुन रु. २० लक्ष चे अर्थसहाय्य देण्याबाबत मंत्री वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा सुधीर मुनगंटीवार यांनी सुचना दिलेल्या असून त्या अनुषंगाने वनविभागाकडुन कार्यवाही सुरु आहे.
वन विभागाद्वारे ग्रामस्थांना जाहीर आवाहन करण्यात येते की, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता
हत्तींची आपल्या क्षेत्रात हलचल आढळून आल्यास तात्काळ वनविभागास माहिती द्यावी. गावांमध्ये एकमेकांनी जनजागृती करुन मानव वन्यजीव संघर्ष होणार नाही व कमीत कमी नुकसान होईल याकरीता नागरीकांनी खालील सुचनांचे पालन करावे.
🔹 सायंकाळी सुर्यास्ता नंतर शेतात एकटयाने थांबू नये.
🔹रात्रीच्या वेळी शेतांमध्ये जागणी करीता जाऊ नये.
🔹 हत्तींचा पाठलाग करु नये.
🔹हत्तीला बघण्यासाठी अथवा कुठल्याही कारणास्तव हत्तींच्या जवळ जाऊ नये.
🔹 शेत पिकांचे नुकसान झाल्यास तात्काळ अर्ज करावे, वनविभागाकडुन नुकसान भरपाई देण्यात येईल.
🔹हत्तींच्या मार्गांमध्ये अडथळा केल्यास तो जास्त विध्वंसक होतो, त्यामध्ये नुकसान टाळण्याकरीता खबरदारी घ्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी केले आहे.