‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेची रांगोळीद्वारे जनजागृती

0
26

गोंदिया- नवरात्री उत्सवानिमित्त जिल्ह्यात १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रीया, किशोरवयीन मुली, बालके यांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान दिनांक २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत राबविण्याचे निर्देश होते परंतु त्याची मुदत आणखी वाढवली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली जेणे करुन १00 टक्के महिलांची तपासणी करता येईल. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गाव पातळीवर तपासणी शिबिरे आयोजित करत आहेत.
या उपक्रमांचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी आरोग्य सेविका, आरोग्यसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सामुदायिक आरोग्य अधिकारी गावोगावी जाऊन तपासणी शिबिरे आयोजित करून उपलब्ध सुविधेबाबत माहिती देत आहे.
तपासणी पाठोपाठ गावोगावी मोहिमे विषयी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. गावात, शाळेत प्रभातफेरी, बॅनर व दवंडीच्या माध्यमातून लोकांना माहिती देण्यात येत आहे. ३0 सप्टेंबर रोजी गोंदिया शहरात मध्यवर्ती रस्त्यावर प्रभातफेरी व चित्ररथाच्या माध्यमातून मोहिमेच्या अनुषगांने जनजागृती करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून रांगोळी द्वारे अनोखा उपक्रम आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया कार्यातील मनीषा देशमुख व ज्योती सावरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेचे रांगोळी काढून जनजागृतीद्वारे लोंकाचे लक्ष वेधले.
जिल्ह्यात सदर मोहिमेचे व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी दिली.