ओबीसी संघर्ष कृती समितीचे लोकेश आत्महत्येप्रकरणी राज्यपालांना निवेदन

0
6

गोंदिया,दि.24-ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदियाच्या वतीने आज बुधवारला महाराष्ट्राचे राज्यपाल,मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,उच्च तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे,उच्च शिक्षण विभागाचे मुख्य सचिव यांच्या नावे असलेले ओबीसी विद्यार्थी लोकेश येरणे अात्महत्येसंबधीचे निवेदन उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव मार्फेत देऊन चौकशी करून संबधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.लोकेशच्या आत्महत्येला  महाविद्यालय प्रशासनासोबतच  सामाजिक न्याय मंत्रालया सुध्दा जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.ओबीसी गटात मोडत असलेल्या या विद्याथ्र्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत असल्याने तो शिष्यवृत्तीसाठी पात्र होता.त्यानुसार त्याला ५० टक्के शुल्क लागते.परंतु महाविद्यालय प्रशासनाने त्यास १०० टक्के शुल्क भरावयास सांगितले.५० टक्के रक्कम भरावयास तयार असतानाही नकार देत त्याचे कागदपत्र परत करण्यास नकार दिल्याने लोकेशला मानसिक धक्का बसला आणि त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला यामुळे यासर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून महाविद्यालय प्रशासनावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली.यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे महासचिव खेमेंद्र कटरे,उपाध्यक्ष मनोज मेंढे,संघटक कैलाश भेलावे, चंद्रकुमार बहेकार,महाराष्ट्र  प्रातिंक तेली समाजाचे जिल्हा महासचिव मुकुंद धुर्वे,प्रांतिक तेली महासभा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष उमेंद्र भेलावे,संतोष वैद्य,कमल हटवार,मिलींद समरीत,रमेश भुतेश्वर आदी उपस्थित होते.