आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदीच्या नोंदणीकरिता शेतकऱ्याच्या लाईव्ह फोटोची अट रद्द करा

0
22

प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांची मागणी

गोंदिया : शेतकऱ्याचा लाईव्ह फोटो असेल तरच धान खरेदीची नोंदणी करण्यात येईल अन्यथा शेतकऱ्याला मुकावे लागेल. अन्न व नागरी पुरवठा विभाच्या सचिवाच्या अध्यक्षेत पार पडलेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अन्यायपूर्ण असून यात लाईव्ह फोटोची अट रद्द करून नोंदणीची तारीख वाढविण्यात यावे, अशी मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी केली आहे.

सविस्तर असे की, अनेकदा आधारभूत धान खरेदी केंद्रावर व्यापारी मोठ्या प्रमाणात धान विकत असल्याचे प्रकार घडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र शेतकऱ्यांना यामुळे होणाऱ्या त्रासाचा कसलाही विचार करण्यात आलेला नाही. इंटरनेट नेटवर्कसह विविध समस्यांना शेतकऱ्याला तोंड द्यावे लागणार आहे.

सन 2022-23 या वर्षात खरीप हंगामात आधारभूत धान खरेदी केंद्रावरती नोंदणी करण्याचे पत्र 23 सप्टेंबर रोजी कळविले आहे. तसेच शेवटची तारीख 15 ऑक्टोबर दिली असून वेळेत नोंदणी न केल्यास शेतकऱ्याला केंद्रावर धान्य देता येणार नाही.

जिल्ह्यात अनेक संस्थेचे संचालक मंडळ, सदस्य बोगस आहेत. अनेक भ्रष्ट सहकारी संस्थेच्या तक्रारी देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यांचा बचाव करण्यात येतो आणि शेतकऱ्याला नाहक त्रास दिला जातो. त्यावेळी लुटारू संस्थेवर कोणतेही निर्बंध शासन, प्रशासन लादत नाही. साधी चौकशी सुद्धा करण्यात येत नाही, चौकशी झाली तर कारवाई होत नाही.

‘कार्यवाहीच्या वेळी अधिकारी भरतो पोट आणि अन्नदाता शेतकरी खातो प्रत्येक वेळी चोट’ अशी अवस्था शासन, प्रशासन यांनी अन्नदात्याची करून ठेवलेली आहे.

भ्रष्ट आधारभूत धान खरेदी केंद्र, पणन, सहकार विभागाचे भ्रष्ट कर्मचारी-अधिकारी यांना पाठीशी घालून शेतकऱ्यांना धान विक्रीच्या जाचक अटी टाकून शेतकऱ्याचे उत्तपिडन होत आहे. असाही आरोप या वेळी महेंद्र भांडारकर यांच्याकडून करण्यात आला आहे.