बालाघाटच्या बांबू कामगारांना एफडीसीएमच्या अधिकार्यांनी ठेवले उपाशी

0
10

चंद्रपूर,दि.26- जिल्ह्यातील कोठारी वनविकास महामंडळातील झरण वनपरिक्षेत्रात बांबू कटाई करण्यासाठी आलेल्या मध्यप्रदेशातील  मजुरांना आठवडी बाजारासाठी पगार न दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्यांना उपाशी पोटी राहण्याची वेळ आली. दरम्यान चुली न पेटल्याने त्यांनी उपाशीपोटी जंगलात ठिय्या मांडला. अन्नाविना तडफडणार्‍या मजुरांकडे मात्र वनविकास महामंडळाच्या एकाही अधिकारी व कर्मचारी वर्गाने लक्ष दिले नसल्याने या मजुरांच्या मानवी हक्कावरच कोठारी एफडीसीएमच्या अधिकायानी गदा आणली आहे.

९0 ते १00 मजूर कोठारी जवळील अडेझरी नाल्यावर रात्रदिवस काढत होते. हा अमानविय प्रकार गोंडपिंपरीचे राजेश कवठे, अरुण वापलवार यांना समजताच त्यांनी तातडीने मजुरांना अन्न पाण्याची व्यवस्था केली. या संतप्त प्रकाराने माणसातील माणूसकी हरविल्याची व मजुरांच्या शोषणाची गंभीर समस्या उघड झाली.
मध्यप्रदेशातील बालाघाट येथील दीड ते दोन हजार मजूर मध्य चांदा वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्रात बांबु कटाईचे कामे गेल्या तीन महिन्यांपासून करीत आहेत. आता बांबू कटाईचे कामे अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण झालेल्या मजुरांना पूर्ण पगार घेवून घराकडे परतीचे वेध लागले आहे. या मजुरांना आवठडी बाजारासाठी २00 ते ३00 रुपये अँडवान्स देण्यात येते. मात्र मागील दोन आठवड्यात मजुरांना पैसे देण्यात आले नाही.