‘आनंदाचा शिधा’ वाटप आता ऑफलाईन”

0
19

गोंदिया- “आनंदाचा शिधा” दिवाळी किट वाटपासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण चारही शिधा जिन्नस ऑनलाईन पद्धतीने वाटपाचे निर्देश होते. आज २३ ऑक्टोबरपासून ऑफलाईन पद्धतीने शिधा जिन्नस वाटपाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. तसेंच जिथे चार पेक्षा कमी शिधा जिन्नस पोहोचले आहेत तिथे प्राप्त जिन्नस वाटपाचे निर्देश प्राप्त झाल्याने सेल्स रजिस्टरवर तशा नोंदी घेऊन वाटप करण्याचे निर्देश सर्व पुरवठा निरीक्षक व त्यांच्या मार्फत दुकानदारांना देण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी लीना फलके यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री यांचे दिवाळीचा शिधा ऑनलाईन पद्धतीने वाटपात अडचण आल्यामुळे व दिवाळसण अवधी बघता ज्या उद्देशाने दिवाळी भेट देण्यात येत आहे तो उद्देश सफल होण्यासाठी वाटप ऑफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत नंतर पुरवठा विभागाला पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्या ठिकाणी ऑनलाईन सुविधा सुरळीत सुरु आहे त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने वाटप करावे. ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीमुळे वेळ लागत आहे असे निदर्शनास येते तेथे २३ ऑक्टोबर पासून आनंदाची शिधा ही दिवाळी भेट ऑफलाईन पद्धतीने पुढील निर्देशापर्यंत राबवता येईल. अशा प्रकरणात शिधा जिन्नस वाटपाची माहिती सेल रजिस्टर मध्ये प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने नोंदवायची आहे. नोंद घेतांना लाभधारकाचे नाव, शिधापत्रिकेचे शेवटचे चार अंक, मोबाईल क्रमांक, दिलेल्या शिधा जीन्नासचा तपशील, प्राप्त रक्कम (१०० रुपये) आणि लाभधाराकाची सही ह्या बाबी नमूद करावयाचे आहे.
काही जिल्ह्यात सगळे शिधाजिन्नस पुरवठाधारकाकडून उपलब्ध झाले नसल्याचे निदर्शनास आले. मात्र काही जिन्नस लाभधारकाला दुकानात उपलब्ध आहे असे दिसून आल्यावर जे उपलब्ध आहे ते देण्यात यावे अशी मागणी होते असे सांगण्यात आले. त्यावर, अशा वेळी उपलब्ध जिन्नस लाभधारकाला देता येतील असे सुचवण्यात आले. याला या बैठकीत सहमती दर्शविण्यात आली. मात्र पुरवठादाराकडून सगळेच जिन्नस प्राथम्याने व त्वरेने प्राप्त करवून घ्यावे अशा सूचना शासनाच्या आहेत. त्याप्रमाणे उपलब्ध जिन्नस वाटपाचा निर्णय घेण्यात आला.
ऑफलाईन पद्धतीचा वापर होत असल्याने लाभ धारकास त्याचे जोडुन दिलेल्या दुकानातूनच शिधा जिन्नस वितरित करणे गरजेचे आहे. जिन्नस वाटप हा दुकानदाराकडून त्याच्या नेहमीच्या ओळख असणाऱ्या शिधाधारकाला होणार आहे. त्यामुळे लाभधारकाकडून मिळणारी रु. १०० ही सवलत रक्कम प्रथम टप्प्यात जमा करवून घ्यावी की संपूर्ण जिन्नस दिल्यावर, याबाबत दुकानस्तरावर निर्णय घेणे योग्य राहील. मात्र त्याचा लेखाजोखा व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. तसेच उर्वरित जिन्नस प्राप्त झाल्यावर त्याची लाभधारकाकडून पोच घेण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल या अटीवर उपलब्ध जिन्नस वितरीत करता येतील.
पुरवठादाराकडून दिवाळी पूर्वीच पुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र त्यास विलंब लागत आहे. दिवाळीसणाच्या निमित्ताने २३ ऑक्टोबर २०२२ संध्याकाळनंतर गोदामात मजुरांची उपलब्धता असणार नाही ही बाब चर्चेस आली. त्यामुळे पुरवठादाराकडून रात्री उशिरा पुरवठा झाल्यास जिन्नस उतरवण्यास अडचण निर्माण होईल ही बाब पुरवठादारास व त्याच्या प्रतिनिधींना कळवण्यात यावी. त्याप्रमाणे अप्राप्त शिधा जीन्नस मजुरांची उपलब्धता असतांनाच त्वरा करवुन घेण्याचे व त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले. ऑफलाईन पद्धत केवळ दिवाळी भेट शिधा जिन्नस वाटपासाठी लागू आहे. अन्य योजनेसाठी ऑनलाईन पद्धतच वापरण्यात यावी.
दिवाळी भेट वाटपासाठी ऑफलाईन पद्धत अस्तित्वात असली तरी गोदामात येणारी जिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणारे जिन्नस यांची नोंद ऑनलाईन पद्धतीनेच ठेवणे आवश्यक आहे. त्याबाबत दक्षता घेण्याच्या व कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.