सिनेट निवडणुकीत जस्टीस पॅनलची एंन्ट्री

0
8

प्रा.डॉ.कमलाकर पायस यांच्या नेतृत्वात उमेदवारी अर्ज दाखल

अमरावती:  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या अधिसभा (सिनेट) निवडणूकीचा बिगुल नुकताच वाजला असून बुधवारी जस्टीस पॅनलने आपल्या उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल केले आहे. पॅनलच्या उमेदवारांनी अध्यक्ष प्रा.डॉ.कमलाकर पायस यांच्या नेतृत्वात दहापैकी सहा जागांवर आपले उमेदवार जाहिर करून त्यांचे नामांकन अर्ज देखील दाखल केले आहे. उर्वरित जागांसाठीही गुरुवारी जस्टीस पॅनलच्या वतीने नामांकन दाखल केले जाणार आहे. जस्टीस पॅनलने आपल्या उमेदवारांसह या निवडणूकीत ‘एंट्री’ घेतली असून प्रचाराला देखील प्रारंभ केला आहे. त्यामुळे  निवडणुक चुरशीची ठरणार असल्याची चर्चा आहे.
जस्टीस पॅनलच्या वतीने प्रा. डॉ.कमलाकर पायस (१० शिक्षक खुला प्रवर्ग), अक्षय दिलीप एडतकर (पदवीधर सर्वसाधारण), बबन इंगोले (पदवीधर अनुसूचीत जाती प्रवर्ग), अपूर्वा सोनार(पदवीधर सर्वसाधारण महिला), हर्षवर्धन तायडे (सर्वसाधारण) डॉ.एस.यु.पेटकर(समाजशास्त्र विभाग) यांनी आपले उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०२२ आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या एक दिवसापूर्वीच जस्टीस पॅनलने आपल्या उमेदवारांचे नामांकन अर्ज बुधवारी २६ ऑक्टोबरला दाखल केले.

प्रतिक्रीया:
हा लढा न्याय आणि हक्कासाठी: प्रा.डॉ.कमलाकर पायस
अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संबंधीत सर्वानाच न्यायासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे. अद्यापही त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांना निखळ शैक्षणिक वातावरण निर्माण करुन देणे गरजेचे आहे. तसेच विद्यापीठातील भोंगळ कारभाराला आळा घालून पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यासाठी व्होट फॉर जस्टीस, व्हॉट टू जस्टीस हे ब्रीद वाक्य घेऊन न्याय आणि हक्कासाठी जस्टीस पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे पॅनलचे प्रमुख प्रा.डॉ.कमलाकर पायस यांनी माध्यमांना सांगितले.