“बळीराजा हे मानवतावादी, समतावादी राज्यकर्ते होते”-नागेश चौधरी

0
17

नागपूर,दि.29-: बळीराजा हे मानवतावादी, समतावादी राज्यकर्ते होते. त्यांच्या मानवतावादी सद्गुणाचा, विषमतावादी बटु वामनाने तीन पाऊल जमीन मागण्याच्या निमित्ताने घात केला. तसेच या देशात वर्ण व जातींची उतरंड असलेली विषमतेने ग्रासलेली जातवर्ण व्यवस्था बळजबरीने लादून भारतातील मानवतावादी, समतावादी मूल्ये संपुष्टात आणण्याचे काम वामनांनी केले, असे परखड मत बहुजन विचारवंत नागेश चौधरी यांनी व्यक्त केले. ते संविधान चौकात सत्यशोधक समाज, बहुजन संघर्ष समिती व इतर समविचारी संघटनांच्या वतीने आयोजित “महात्मा बळीराजा महोत्सवात” प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज, नागपूर शाखेचे अध्यक्ष टेमराज माले होते.
प्रारंभी स्थानिक काॅटन मार्केट चौक नजिक अललेल्या म.फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळयांना माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक काळातील बळीराजाचे समतावादी विचाराचे वारस असल्याने त्यांना अभिवादन करुन बळीराजाचे स्मरण करण्यात आले,
इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो! अशी आराधना करणाऱ्या आमच्या पूर्वजांनी जपून ठेवलेल्या बळीराजाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. जयघोष करण्यात आला.विषषमतावादी वामनी विकृतीचा धिक्कार करण्यात आला. त्यानंतर ताफा संविधान चौकाकडे रवाना होऊन सुरवातीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर अभिवादन सभा पार पडली. महात्मा बळीराजा यांचा उत्सव सार्वजनिकरित्या सुरू करण्याची संकल्पना दिवंगत माजी आमदार आ.ला.वाघमारे यांनी १९८७ मध्ये मांडली व ती आज संपूर्ण भारतात उत्साहात साजरी होत आहे, असेही नागेेश चौधरी यांनी सांगितले. विषमतेवर मात करण्यासाठी बळीराजाला अभिप्रेत असलेला विचार समाजात रूळल्याशिवाय समता व मानवता रूजणार नाही, असेही ते नागपूर बळीराजा उत्सवात म्हणाले.बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचे स्मरण करण्याचा सण. भारतीय संस्कृतीत बळीराजा न्यायी, दानशूर,सद्गुणी म्हणून विख्यात आहे.बळीचे राज्य अर्थात समतेचे,न्यायाचे राज्य. बळीचे राज्य म्हणजे स्त्रीपुरुष विषमता, जातीभेद, वर्णभेद रहित राज्य. अशा महादानशूर, संविभागी बळीराजाची आठवण दिवाळीला- बलिप्रतिपदेला बळीराजाचे वारस, शेतकरी आयाबहिणी
इडापीडा जावो।
बळीचे राज्य येवो।।
असे स्मरण करत असतात.यादिवशी दरवर्षी बळीराजा उत्सवही मोठ्या उत्साहाने अनेक ठिकाणी साजरा करण्याची परंपरा रुढ होत आहे. यानिमित्ताने नागपूरला दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ ला बळीराजा उत्सव साजरा करण्यात आला.राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सुषमा भड,शरद वानखेडे, सत्यशोधक समाजाचे बाबा बिडकर,अनुज हुलके व टेमराज माले यांनीही यावेळी बळीराजाच्या महत्तेवर प्रकाश टाकला. “इडा पिडा टळो, बळीचे राज्य मिळो”,” वामन राज हटायेंगे, बली राज लायेंगे”, ” वामन राज हटायेंगे, बहुजन राज लायेंगे” अशा बुलंद घोषणांच्या निनादात कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात अशोक ठाकरे, दिवाकर वर्षे, विनोद उलीपवार, सुरेश मानमोडे, मिलिंद पखाले, गणेश नाखले, संजय मांगे, माधुरी सेलोकर,सुषमा रामटेके, प्रकाश दुलेवाले,प्रकाश पाठराबे,देवेंद्र बोकडे,श्रीरंग मदनकर,सुरेश कुथे, नरेंद्र सहस्त्रबुध्दे, राजू बोचरे, कुमूद वर्षे, मीरा मदनकर, गोविंद वरवाडे,यांच्यासह अनेक समतावादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.