आरएसएस मुख्यालयावर शेतकर्यांनी काढलेला मोर्चा पोलीसांनी अडवला

0
10

वर्धा,दि.28- वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील 300 शेतकर्‍यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या शेतकर्‍यांना आधीच अडवून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.भारतीय किसान खेत मजदुर काँग्रेसच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

सेलूतील शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी केल्यानंतर सुनील टालाटुले या श्रीकृष्ण जिनिंग प्रेसिंगच्या संचालकांनी 450 शेतकर्‍यांचे आठ कोटी रुपये न दिल्याने आणि टालाटुले यांनी आरएसएस तसंच भाजपच्या नेत्यांशी जवळचे संबंध असल्याची बतावणी केल्याने हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संघमुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. भारतीय किसान खेत मजदुर संघाचे अध्यक्ष रामनारायण पाठक यांच्या नेतृत्वाता हा मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, शेतकर्‍यांच्या विधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रामगिरीवर मोर्चा काढला होता. पोलिसांनी मात्र रामगिरीआधीच महिलांना अडवलं आणि 50 महिलांना ताब्यात घेतलं. क्रंातीकारी शेतकरी महिला संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकरी विधवा महिला सामिल झाल्या होत्या. सरकारने स्वामिनाथन आयोग लागू करावा, सिंचनाची सोय करावी जेणेकरून शेतकरी आत्महत्या होणार नाहीत अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली