बाघ पाटबंधारे कार्यालय परिसरातील सागवन वृक्षांची कत्तल

0
15

 सालेकसा- तालुक्यातील साखरीटोला नजिकच्या मक्काटोला येथे असलेल्या पाटबंधारे विभागाच्या शाखा कार्यालय परिसरातील सागवन वृक्षांची अवैधरित्या कत्तल करण्यात आली. एवढेच नव्हेतर सागवन लाकडांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचे उघडपणे दिसून येत आहे. कुंपणच खात आहे शेत या म्हणीप्रमाणे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍याकडूनच हे कृत्य करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात संबधित शाखा अभियंता प्रियम शुभम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वादळामुळे झाडे पडल्याने कापण्यात आली, असे सांगितले आहे. या प्रकाराकडे वनविभागाचेही सोयीस्कर दुर्लक्ष आहे. त्यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.
साखरीटोला वनक्षेत्र अंतर्गत येणार्‍या मक्काटोला येथे बाघ पाटबंधारे विभागाचे शाखा कार्यालय आहे. या ठिकाणी शाखा अभियंता निवासस्थानही आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यालय परिसर तसेच निवासस्थानाच्या मागील भागात मोठ्या प्रमाणात सागवनाची झाडे होती. मात्र गेल्या काही दिवसातच कार्यालय परिसरातील झाडांची अवैधरित्या कत्तल करून लाकडांची परस्पर विल्हेवाट लावल्याचे पहावयास मिळत आहे. एंकदरीत सागवनाची तस्करी झाल्याचे उघडपणे दिसून येत आहे. मात्र या सर्व प्रकारापासून बाघ पाटबंधारे तसेच वनविभागाचे अधिकारी अनभिज्ञ कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. कार्यालय परिसरात कापलेल्या झाडांचे प्रत्यक्ष पुरावे पहावयास मिळत आहेत. वनविभाग तथा बाघ पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या बाबीची तसदी घेवून चौकशी करावी तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरात जोर धरू लागली आहे.

कार्यालय परिसरातील झाडाची कत्तल आणि लाकडांची विल्हेवाट या दोन्ही प्रकाराची आपणास कसलीही माहिती नाही. तरीही या प्रकरणाची माहिती घेवून चौकशी करू तसे वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात येईल.
– एम.पि.कठाणे,सहाय्यक कार्यकारी अभियंता आमगाव

संबंधित प्रकरणाची माहिती घेवून त्या संदर्भात चौकशी करण्यात येईल. चौकशीत तथ्य आढळल्यास तसेच या प्रकरणात जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर योग्य कारवाई करणार.
– राजीव कुरेकार,कार्यकारी अभियंता गोंदिया

नियमानुसार परवानगी घेतल्याशिवाय झाडे कापता येत नाही. मात्र बाघ पाटबंधारे विभाग कार्यालय परिसरातील झाडाची अवैधरित्या कत्तल करण्यात आली. अशी तक्रार प्राप्त असून त्याची दखल घेण्यात आली आहे. चौकशी करीता कर्मचार्‍यांना कामाला लावण्यात आले आहे. या प्रकरणातील दोषींवर वनअधिनियमातंर्गत कारवाई करण्यात येईल.
– जी.एस.राठोड,वनपरिक्षेत्राधिकारी सालेकसा