निर्दोष युवकावर हत्येच्या कबुलीसाठी दबाव: गुडरामच्या ग्रामसभेची राज्यपालांकडे तक्रार

0
8

गडचिरोली,.१: पोलिस खबऱ्याची हत्या, चकमकी व जाळपोळीत सहभागी असल्याचे जबरदस्तीने कबूल करायला लावून एका निर्दोष आदिवासी युवकावर आत्मसमर्पण करण्यासाठी दबाव आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारा ठराव एटापल्ली तालुक्यातील गुडराम येथे पार पडलेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. हा ठराव राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. देविदास मट्टामी प्रकरणी महामहीम राज्यपालांनी संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याचे व वरिष्ठस्तरीय चौकशीचे आदेश द्यावे, तसेच गावातीलच लक्ष्मण गावडे व पांडू मट्टामी यांना खोटया प्रकरणात गुंतविण्याच्या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी ग्रामसभेने केली आहे. हे प्रकरण राज्यपालांकडे पोहचल्याने आता सर्वांचे लक्ष त्यांच्या आदेशाकडे लागले आहे.

१८ फेब्रुवारीला गुडराम येथे परिसरातील गावांमधील नागरिकांची ग्रामसभा घेण्यात आली. भिमाजी पोटावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला गुडरम, कारका, मानेवारा, भूमकान व अन्य गावांतील सुमारे दीड हजार नागरिक उपस्थित होते. या ग्रामसभेत पोलिसांनी आत्मसमर्पणासाठी दबाव आणलेल्या देविदास मट्टामी या युवकाने आपबिती ग्रामसभेपुढे कथन केली. देविदासने सांगितले की,आपण नागपुरातील एका कंपनीत काम करीत असून, वाडी येथे एका भाडयाच्या खोलीत मित्रांसह वास्तव्य करतो. २९ जानेवारी २०१६ रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास रामा कुडयामी व बहादूर सिडाम आणि त्यांचे अन्य पाच ते सहा सहकारी माझ्या खोलीवर आले. त्यांनी माझे नाव विचारुन खोलीबाहेर काढले आणि टाटा सुमो गाडीत बसवून नागपुरातील एका शासकीय कार्यालयात नेले. त्यानंतर रात्री मला रामा कुडयामी, बहादूर सिडाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन रात्रभर तेथेच ठेवले. दुर्गू आतला नामक पोलिस खबऱ्याची हत्या मीच केली, अशी तू कबुली दे, असा दबाव ही मंडळी माझ्यावर आणत होती. परंतु मी दुर्गू आतलाची हत्या केलीच नाही, असे हात जोडून सांगितले.

परंतु त्यांनी काहीही न ऐकता मला दुसऱ्या दिवशी गडचिरोलीला आणून एका शासकीय खोलीत बंदिस्त करुन ठेवले. “दुर्गू आतलाच्या हत्येची कबुली दे, आम्ही तुला दोन लाख रुपये देऊ” असे आमिष दाखवले. दरम्यान मला काही लोकांनी उचलून नेल्याची माहिती मिळताच माझे कुटुंबीय गडचिरोली येथे पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी गडचिरोलीला आले. पुढे ही माहिती मिळताच मला संबंधित मंडळींनी पुन्हा रात्रीच नागपूरला नेऊन सोडले. याबाबतची तक्रार आपण वाडी पोलिस ठाण्यात डाकेद्वारे केली आहे. या सर्व प्रकरणात अपहरण, मारहाण करणे, हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी पैशाचे आमिष दाखविणे याबाबत रामा कुडयामी, बहादूर सिडाम व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी तक्रारीत केल्याचे देविदास मट्टामी याने ग्रामसभेत सांगितले.

यासंदर्भात ग्रामसभेने ठराव घेतला असून, तो महामहीम राज्यपालांना पाठविला आहे.