समृद्धी महामार्ग : वाशीमच्या विकासाला दिशा

0
11
रस्ते,इमारती आणि पूल ही विकासाची प्रतिके समजली जातात. अशाप्रकारच्या विकासामुळे राज्याच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होतो. दळणवळणाच्या चांगल्या सुविधांमुळे विकासाला गती मिळते.विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागाच्या विकासाला गती मिळणार आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात पूर्णत्वाकडे गेलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे.या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुक्यातील मौजे वायफळ येथे होणार आहे.महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या राज्यातील सुमारे ३६ टक्के जनतेच्या जीवनात थेट परिवर्तन घडण्यास या महामार्गाची मदत होणार आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्यातील १० जिल्हे,२६ तालुके आणि ३९२ गावाजवळून जातो.
        पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी यादरम्यानच्या ५२० किलोमीटर महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नागपूर ते शिर्डी दरम्यानचा ११ तासांचा प्रवास केवळ पाच तासात होणार आहे.७०१ किलोमीटरचा नागपूर ते मुंबई दरम्यानचा हा ७०१ किलोमीटरचा महामार्ग पूर्ण होताच १८ तासांचा प्रवास केवळ ८ तासात पूर्ण होईल.या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया एक वर्षाच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाली आहे. या महामार्गामुळे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास आरामदायी होणार आहे. राज्याची उपराजधानी नागपूर ते देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या महामार्गामुळे जोडली जाणार असल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हा राजमार्ग ठरणार आहे.
           द्रुतगती महामार्गालगत 20 ठिकाणी सुविधा केंद्रे निर्माण होतील. प्रादेशिक बाजारपेठेत वाढ होणार असल्यामुळे शेतातील उत्पादित शेतमालाला जलद गतीने बाजारपेठ गाठता येणार आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागातील शेतकरी नगदी पिकाकडे वळून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. हा महामार्ग ज्या भागातून जात आहे त्या भागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ध्वनीरोधक १०० वन्यजीव मार्ग तयार करण्यात आले आहे. या महामार्गासाठी लागणाऱ्या गौण खनिजाच्या उपशातून १००० कृत्रिम शेततळ्यांची निर्मिती करण्यात आल्यामुळे या भागातील भूजल पातळीत वाढ होऊन काही प्रमाणात शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली आहे.समृद्धी महामार्गालगत ११ लाख ३१ हजार झाडे जवळपास २२ लाख ३४ हजार झुडपे व वेलींचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.१८ नवनगरांची निर्मिती करण्यात येणार आहे. १५ वाहतूक सहाय्य केंद्रे, बचाव व दुर्घटना नियंत्रणासाठी २१ जलद प्रतिसाद वाहने आणि लाइफ सपोर्ट सिस्टीमसह २१ रुग्णवाहिका या महामार्गावर तैनात राहणार आहे.१३८ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती या महामार्गादरम्यान करण्यात येणार आहे. २२ जिल्ह्यांना गॅस उपलब्धतेची निश्चिती, वाहन चार्जिंग स्टेशनच्या सुविधेमुळे ऊर्जेत बचत होणार आहे.
     केंद्र सरकारच्या निती आयोगाने देशात ११४ मागास जिल्हे निवडले. त्या जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे.वाशिम जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा ठपका मिटविण्यात या महामार्गाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान कमी असल्यामुळे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणारा इथला शेतकरी केवळ सोयाबीन,तूर व कापूस ही पिके घेतो.समृद्धी महामार्गाच्या सुविधेमुळे आता शेतकरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेती संरक्षित सिंचनाखाली आणून नगदी पिकाची कास धरणार आहे.त्यामुळे शेतीतून उत्पादित होणारा माल तो त्वरित नागपूर,मुंबई औरंगाबाद,नाशिक व ठाणे या ठिकाणी महामार्गाच्या सुविधेमुळे विक्रीला घेऊन जाईल.उत्पादित माल मुंबई येथून हवाई मार्गाने व जलमार्गाने विदेशात निर्यात करता येईल त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यास या महामार्गाचा महत्त्वाचा वाटा राहणार आहे.
       नागपूर – मुंबई दरम्यानच्या या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची वाशिम जिल्ह्यातील लांबी ही ९७.२३ किलोमीटरची आहे.जिल्ह्यातील ५४ गावाजवळून हा महामार्ग जात असून कारंजा तालुक्यातील २१ गावे, मंगरूळपीर तालुक्यातील १० गावे मालेगाव तालुक्यातील २२ गावे आणि रिसोड तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे.जिल्ह्यातून ९७ किलोमीटरचा हा महामार्ग जात असल्यामुळे कारंजा तालुक्यातील शहा नवनगर, मंगरूळपीर तालुक्यात वनोजा नवनगर आणि मालेगाव तालुक्यातील इरळा नवनगर या तीन ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे अर्थात कृषी हब इंटरचेंजच्या भागात प्रस्तावित आहे. ही कृषी समृद्धी केंद्रे उभारणीला दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. प्रस्तावित नवनगरांमुळे जिल्ह्यात कृषी आधारित उद्योग निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य भाव मिळणार आहे.जिल्ह्यातील युवक- युवतींना स्थानिक भागात मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहे.या समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासाला दिशा मिळणार आहे.
विवेक खडसे 
जिल्हा माहिती अधिकारी
वाशिम