उपोषणकर्त्यांनो, माझेकडे वेळ नाही.. मला विमान पकडायचे!

0
19

सतीश कोसरकर

नवेगावबांध(गोंदिया),दि.७– सत्ता नसताना सरकारविरोधात गळा काढून दीनदुबळ्यांचा कैवारी असल्याचा आव आणायचा आणि सत्ता मिळाली की अडचणीत सापडलेल्या त्याच मतदारांना वाऱ्यावर  सोडून स्वतः सत्तासुंदरीचा आस्वाद घ्यायचा, याचा  अनुभव गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला काही नवीन नाही. असाच काहीसा प्रकार अर्जूनीमोरगाव तालुक्यात घडला. मंत्री महोदयांनी उपोषण कर्त्यांच्या समस्या सोडविणे तर दूरच, पण त्या ऐकायलाही त्यांचेकडे वेळ नसणे, हे जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’  महोदय जनतेला वाढून निघून जात असल्याच्या प्रतिक्रिया जिल्ह्यात कानावर पडत आहेत. माझेकडे वेळ नाही, मला विमान पकडायचे आहे, असे बोलून जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री हे उपोषण स्थळावरून निघून गेले.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध जलाशयाच्या पाण्यावर ओलिताचा हक्क असणाऱ्या पाच गावांतील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी रविवारपासून आंदोलन सुरू केले. आंदोलनाचा आजचा तसा दुसरा दिवस. त्यातही हा मतदारसंघ राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा. येथील मतदारांनी त्यांच्या पदरात मतांचे दान केले.  त्याच मतदारांच्या जोरावर ते या  मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा निवडून गेलेत. त्यामुळे त्यांना ज्या मुद्याला घेऊन शेतकरी उपोषणाला बसले तो विषय नवा नाहीच. त्यामुळे मंत्री महोदय तो विषय निकाली काढतील असा उपोषणकर्त्यांचा समज झाला. अधिकाऱ्यांना बोलावून तोडगा काढण्याचे निर्देश मंत्रीमहोदय देतील , ही भाबडी आशा अखेर फोल ठरली. ” माझ्याकडे सध्यातरी वेळ नाही, विमान पकडायचे आहे”, असे उत्तर देत त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वाटाण्याच्या अक्षता लावत आमच्या लेखी मुळीच महत्त्व नाही, असाच काहीसा संदेश देत  अवघ्या पाच मिनिटातच बडोले साहेब रवाना झाले. त्यांना आपल्या मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडविण्यात रस नसल्याचे   ते जिल्ह्याच्या समस्या तरी काय  सोडविणार, अशा प्रश्न उपोषणकत्र्यांनी उपस्थित करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज सोमवारला सायकांळी ५.३० मिनिटानी उपोषण मंडपाला भेट दिली. बडोले पोचताच उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार करीत आपण मंत्री असूनही प्रश्न कसा सुटत नाही, असा मुद्दा उपस्थित केला. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने पालकमंत्री यांनी तो प्रश्न निकाली काढण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलवायला हवे होते. परंतु, तसे झाले नाही. उलट अवघ्या पाच मिनिटातच माझ्यकडे आज वेळ नाही, मला मुबंईला जाण्यासाठी विमान पकडायचे आहे, असे सांगत तिथून काढता पाय घेतला. त्यांच्यासोबत माजी आमदार दयाराम कापगते हे सुध्दा होते. बडोले यांनी जसे मला वेळ नाही असे बोलताच उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांचा राग अनावर झाला असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

संतप्त शेतकऱ्यांनी पाणी चोरीत अधिकऱ्यांचाही हात असल्याचा आरोप करीत थेट नवेगावबांध पोलिसात तक्रार दाखल केली. अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पाटबंधारे कार्यालयासमोर ११ शेतकऱ्यांनी रविवारपासून (ता. ६) बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. नवेगावबांध येथील पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांच्याविरुद्ध शुक्रवारी (ता. ४) ही तक्रार दाखल केली आहे.
नवेगावबांध गटक्रमांक १२९२ तलावाचे पाणी नवेगावबांध, मुंगली, देवलगाव, येरंडी व खोली या पाच गावातील शेतीच्या ओलितासाठी व निस्तारासाठी राखीव केले आहे. ही शेती ओलिताखाली आहे. नवेगावबांध तलावाच्या वरच्या भागातील धाबेपवनी, कोहळीटोला, जांभळी, येलोडी व रामपुरी येथील शेतकऱ्यांनीदेखील धानाच्या उन्हाळी पिकाची लागवड केली. नवेगावबांध तलावातील पाणी अनधिकृतरित्या ते पिकांना देत आहेत. यासाठी नहर खोदण्यात आले. मोटारपंपाचा उपयोग करण्यात येत आहे. सदर पाणीचोरीची बाब २००० सालापासून दरवर्षी सुरू आहे. या पाणी चोरींविरुद्ध लाभार्थी पाच गावातील शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रार केली. परंतु, पाटबंधारे विभागाने मात्र थातूरमातूर चौकशी केली व दंड ठोकून पुन्हा त्यांना मोकळे सोडले.