अंबाझरी उद्यानातील आंबेडकर भवन पाडणे भोवणार!:20 तारखेला विधान भवनावर मोर्चा

0
21

नागपूर – अंबाझरी (Ambazari) परिसरात ५७ वर्षापासून असलेले आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करावी, आणि नव्याने भवन उभारावे या मागणीसाठी २० डिसेंबर रोजी विधान भवनावर मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदरची जमीन नागपूर महानगरपालिकेच्या ताब्यातून परत घेऊन महाराष्ट्र शासनाने एका निर्णयाद्वारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांना भाडेपट्ट्यावर दिली.

या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 20 सप्टेंबर 2017 च्या आदेशान्वये ही 44 एकर जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित केली. त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही जमीन मेसर्स गरुडा अम्युझमेंट पार्क या खाजगी कंपनीला 6 सप्टेंबर 2019 ला देखभाल करण्यासाठी हस्तांतरित केली. सदर मेसर्स गरुडा अमेजमेंट पार्क या कंपनीने अंबाझरी तलाव परिसरातील 44 एकर जागेवर आपले काम सुरू करून सर्वप्रथम येथील उद्यानांमधील बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या चारही बाजूला टिन पत्रे उभारून बेमालुमपणे बेकायदेशीररित्या कोणासही माहित करू न देता उध्वस्त केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी जागा बळकावण्यासाठी अवैधरित्या आंबेडकर भवन तोडून खाजगी कंपनीला पर्यटन विकासाच्या नावावर ही जागा दिली आहे. या निर्णयाने आंबेडकरी जनतेत रोष आहे. पर्यटनाच्या नावावर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिलेली जागा मिळविण्याचा हा प्रयत्न असून तो आंबेडकरी जनता हाणून पाडल्या शिवाय राहणार नाही असे समितीचे संयोजक किशोर गजभिये यांनी ठणकावले आहे. 1956 च्या धम्मदीक्षा सोहळ्यानंतर महापालिकेने बाबासाहेबांचा सत्कार केला होता. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या सन्मानार्थ विशेष स्मारक करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

यासाठी राज्य शासनाने 44 एकर जमीन महापालिकेला दिली. 24 एकर जमिनीवर उद्यान तर वीस एकर मध्ये स्मारक अशी योजना होती. मात्र आता ही वीस एकर जागा खाजगी कंत्राटदाराच्या मदतीने बळकावण्यासाठी महापालिकेचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. तरी सरकारने तत्काळ अधिसूचना रद्द करावी, बेकायदेशीर स्मारक तोडणाऱ्या कंपनी संचालकावर गुन्हा दाखल करावा आणि अंबाझरीतील जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार करावे अशी मागणी बाळू घरडे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. धनराज डहाट, तक्षशिला वाघदरे, आर.एस. अंबुलकर, कल्पना मेश्राम, छाया खोब्रागडे, डॉ. सरोज डांगे आदींनी केली आहे.