उसाच्या शेतात सापडलेल्या दोन बछड्यांना वनविभागाने वाचविले

0
20

अर्जुनी मोरगाव,दि.31ः गोंदिया जिल्ह्यातील काही भागात सध्या उस तोडणीचा हंगाम सुरू आहे. अशातच नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने मार्तंड कापगते यांच्या उसाच्या शेतात सापडलेल्या दोन बछड्यांना यशस्वीरित्या मादा बिबटशी भेट करून देण्यात आली.

सदर उसाचे शेत हा गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगांव तालुक्यातील सानगडी मार्गावरील नवेगावपासून सुमारे ६ किलोमीटर लांब भिवखिडकी या गावात आहे. यासंदर्भात माहिती देताना सहायक वनसंरक्षक दादा राऊत यांनी सांगितले की, गुरुवारला सकाळच्या सुमारास पुंडलिक कांबळे यांच्याकडून सूचना मिळाली की ऊस तोडणी दरम्यान मार्तंड कापगते यांच्या शेतात त्यांना दोन बिबटचे बछडे आढळून आले. ही माहिती कळताच वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने घटनास्थळ गाठले.

पशुवैद्यकांना बोलावून त्या बछड्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यांना शेळीचे दूधही देण्यात आले. त्या बछड्यांना प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवण्यात आले व त्या ठिकाणी ट्रॅप कॅमरे लावण्यात आले. त्यानंतर मादा बिबटच्या येण्याची वाट पाहण्यात आली. गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ती मादा बिबट त्या ठिकाणी आली आणि आपल्या दोन्ही बछड्यांना सोबत जंगलात घेऊन गेली.ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक कुलराजसिंग यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक दादा राऊत, उपवनसंरक्षक सचिन कटरे, वनविभागाच्या शीघ्र कृती दलाचे मिथुन चौहान, अमोल चौबे, सतीश शेंद्रे, पंकज पाथोडे आदींनी यशस्वीरित्या पार पाडली.