राष्ट्रसंतांच्या पालखी यात्रेने दुमदुमले भजेपार

0
20

– तीन दिवसीय पुण्यतिथी महोत्सव संपन्न

सालेकसा: तालुक्यातील भजेपार येथे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. दरम्यान राष्ट्रसंतांच्या पालखी यात्रेने संपूर्ण गाव दुमदुमले होते. या तीन दिवसीय महोत्सवात महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
ग्राम स्वच्छता अभियान राबवून गुरुदेव सेवा मंडळाने पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात केली. पहिल्या दिवशी सामुदायिक प्रार्थना,ध्यान,चिंतन,भाषण यासह रात्रीला प्रसिद्ध शाहीर मधुकर बांते यांनी आपल्या पहाडी आवाजात राष्ट्रसंतांच्या जीवनावर पोवाड्याच्या माध्यमातून प्रकाश टाकला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी लोक वर्गणीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद अध्ययन कक्षाच्या इमारतीचे उद्घाटन आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. स्पर्धा परीक्षेला जिल्ह्यातील जवळपास 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात यशस्वी विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्ययन कक्षात अभ्यास करून शासकीय नोकरी प्राप्त करणाऱ्या यशवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा देखील सत्कार करण्यात आला. रात्री अनमोल रत्न पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय कीर्तनकार हभप परमेश्वरी सेलोटकर, गुरुकुंज आश्रम मोझरी यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. दरम्यान कीर्तनानंतर त्यांनी लाठी काठी, दांडपट्टा, तलवारबाजी यांचे चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर करून महिला व मुलींना आत्म सुरक्षिततेचा धडा दिला. यात गुरुदेव उपासकांची अलोट गर्दी होती. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी गावातून राष्ट्रसंतांची पालखी यात्रा काढण्यात आली. पालखी यात्रेच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी आपल्या घरासमोर सडा सारवण करून महापुरुषांच्या फोटो पूजेसाठी ठेवल्या होत्या. गाव भ्रमणानंतर ध्यान मंदिरात पालखी यात्रेची सांगता केल्यानंतर गुरुकुंज आश्रम मोझरी येथील राष्ट्रीय कीर्तनकार तथा ग्रामगीताचार्य राजाजी प्रभू शेलोटकर यांच्या मधुर वाणीतून गोपालकाला करण्यात आला. दरम्यान चार जोडप्यांचे सामूहिक लग्न देखील मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, आमदार सहषराम कोरोटे, जिल्हा परिषद सदस्य वंदना काळे, जीप.सदस्य उषा मेंढे, सरपंच चंद्रकुमार बहेकार, माजी सरपंच सखाराम राऊत, माजी जीप. महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, देवराम चूटे, तुकाराम बोहरे, सचिन बहेकार सर्व नव नियुक्त ग्राम पंचायत पदाधिकारी सहित अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. संचालन विवेक बहेकार आणि लोकेश चुटे तथा आभार प्रदर्शन नंदकिशोर कठाने यांनी केले. पुण्यतिथी महोत्सवाच्या आयोजनासाठी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ बहेकार, उपाध्यक्ष कृष्णकुमार चूटे, सचिव सेवकराम बहेकार, सहसचिव टायकराम ब्राह्मणकर, कोषाध्यक्ष रामजी चुटे, संघटन अध्यक्ष खुशाल शिवणकर, कार्याध्यक्ष धनराज बहेकार, सर्वाधिकारी महेश चुटे यांनी अथक परिश्रम घेतले. आयोजनासाठी स्थानिक ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष, महीला बचत गट,भजन मंडळ, सूर्योदय क्रीडा मंडळ,श्री मंगरुबाबा चौरागड आश्रम समिती आणि समस्त ग्राम वासियांचे विशेष सहकार्य लाभले.तीन दिवसीय महोत्सवात गावाला जणु मोझरीचे रूप आले होते.