मूळचा सौंदड निवासी सुबोध भैसारे ‘जेएमएफसी’ परीक्षेत राज्यात पहिला

0
47

गोंदिया,दि.20ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथील मूळगाव परंतू सध्या सोलापूरचा रहिवासी असलेल्या सुबोध भैसारे हा राज्यात पहिला आला आहे. सुबोध याने 200 पैकी तब्बल 178 गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकवाले आहे. सुबोधचे वडील अशोक भैसारे देखील न्यायाधीश राहिले आहेत. त्यामुळे त्यांची दुसरी पिढी न्यायिक क्षेत्रात येणार आहे. ‘जेएमएफसी’ परीक्षा देत वयाच्या 27 व्या वर्षी सुबोधने यशाला गवसणी घातली आणि त्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला. सुबोधच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सुबोधचे 10 वी पर्यंतचे शिक्षण सोलापुरात व 12 वीचे शिक्षण हे चंद्रपुरात झाले आहे. पुण्यातल्या आयएलएस महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतले आहे. ” आपण बालपणापासूनच वडीलाकंडे बघत होतो,सोबतच त्यांच्यासोबत असलेल्यांचे राहणीमान व विचार आपल्या मनात रुजले,तेव्हापासूनच या न्यायीक क्षेत्रात जाण्याचा मानस पक्का केला.सोबतच आपल्यात न्यायदान योग्यरितीने करण्याची गुणवत्ता असल्याची जाणिवही झाल्याने 12 वी नंतर विधीच्या अभ्यासक्रमाकडे वळल्याचे बेरार टाईम्ससोबत बोलतांना सांगितले.

सुबोधचे वडील सेवानिवृत्त न्यायाधिश अशोक भैसारे हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील रहिवासी आहेत.त्यांचे शिक्षण सौंदड,गोंदिया व साकोली येथे झाले.नोकरीनिमित्ताने सौंदड सोडून  धुळे, चंद्रपूर, नागपूर, पुणे, ठाणे आणि सोलापूर या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश म्हणून सेवा बजावली आहे. ते सध्या सोलापूरच्या ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष आहेत.विशेष म्हणजे सुबोध भैसारे याचा मोठा भाऊ शुभम भैसारे हा देखील मागील वर्षी IAS परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि आता सुबोध न्यायाधीश झाला आहे. त्यामुळे भैसारे कुटुंबियांच्या आंनदाला पारावार उरलेला नाही.

अशोक भैसारे यांनी बेरार टाईम्ससोबत भ्रमणध्वनीवर बोलतांना आपण आज जरी आपल्या मूळगावापासून लांब राहत असलो तरी नातेवाईक आणि आपले घर,शेती सौंदड परिसरातच असल्याने आम्ही सहा महिने,वर्षातून गावाकडे येत असतो असे सागंतच मुलाने यशाचे गाठलेले शिखर हे त्यांने केलेल्या परिश्रमाचे फळ असल्याचे सांगितले.