वारकरी संत परंपरेचा विद्रोह त्यांना अजूनही गिळता आला नाही- चंद्रकांत वानखेडे

0
20

नागपूर,दि.२२ : येत्या दिनांक 4 व 5 फेब्रुवारी 2023 ला वर्धा येथे होऊ घातलेल्या अ.भा.विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष शेतकरी नेते, पत्रकार, गांधी का मरत नाही या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक चंद्रकांत वानखेडे यांचा सत्कार नागपूरला सत्यशोधकी विचाराच्या विविध संघटनांनी केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना, विद्रोही परंपरेतील अनेक प्रवाह रा.स्व.संघाने गिळंकृत केले हे खरे असले तरी, महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरेचा विद्रोह त्यांना अजूनही गिळता आला नसल्याचे प्रतिपादन मा.चंद्रकांत वानखेडे यांनी अनेक दाखले देत केले. संत नामदेव, संत तुकाराम ते संत गाडगेबाबा पर्यंतच्या वारकरी संतांचा विद्रोह प्रखर समतावादी असल्याने तो आजतागायत सनातनी प्रवाहाला गिळंकृत करता आला नसल्याचे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.गाईचे रक्त पिणाऱ्या गोचीडांना मारण्याच्या नादात गाईवरच रट्टे देऊन घायाळ केले जात असल्याचे सांगून परिवर्तनवादी चळवळीतील वैगुण्यावर त्यांनी नेमकेपणाने बोट ठेवले. बहुजन चळवळींमध्ये हेच घडत असल्यामुळे ज्यांच्यासाठी चळवळी आहे तोच त्यापासून दूर जाताना दिसतो, हे वास्तव त्यांनी यावेळी मांडले. रक्तपिपासू गेचूडांचा नायनाट करताना गाई-बैलांना इजा होणार नाही, गेचूडच बरे आहे असे वाटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

विद्रोही सांस्कृतिक प्रवाह मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध परिवर्तनवादी संघटनांनी एकत्रित काम करण्याची गरज लक्षात घेऊन वर्धा येथे होऊ घातलेल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बुद्ध, मार्क्स, फुले, शाहू, आंबेडकर, गांधी ,संत परंपरा हा समतेच्या बाजुचा प्रवाह एकत्रित करून शोषितांचा लढा गतीमान करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत आहे. यामुळेच ‘गांधी का मरत नाही’ या बहुचर्चित लोकप्रिय पुस्तकाचे लेखक, प्रसिद्ध पत्रकार, शेतकरी नेते असलेले विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष  चंद्रकांत वानखेडे यांचा सत्कार, फुले शाहू आंबेडकरी विचारवंत मा. प्रभाकर पावडे यांचे हस्ते करण्यात आला.

हा कार्यक्रम सक्करदरा परिसरातील सेवादल महाविध्यालायाच्या सभग्रुअहत पार पडला. यावेळी बहुजन संघर्षचे संपादक  नागेश चौधरी, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी,प्रसिद्ध शिल्पकार गोपाल नायडू, सत्यशोधक चळवळीच्या साहित्याचे अभ्यासक, ओबीसी चळवळीचे मार्गदर्शक आणि वर्धा येथे होऊ घातलेल्या १७ व्या अ.भा.विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा प्रतिमा परदेशी यांनी शोषणाविरुद्ध सर्व शोषितांना एका प्लॅटफॉर्मवर आणून शोषकांविरुद्धचा विद्रोह तीव्र करण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलन असल्याची भूमिका सविस्तर विषद केली.

या संमेलनाचे मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी ओबीस, दलित, आदिवासी शेतकरी कामगार बहुजन समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन असल्याचे सांगितले. सत्यशोधकी प्रवाहाची एकी करुन शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव, बेरोजगारी, ओबीसी जनगणना इत्यादी प्रश्नावर संमेलनात चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला, बहुजन महापुरुष यांचा अपमान करणाऱ्या तसेच दलित, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन आदी लोकांचा छळ करणाऱ्या सनातनी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याचे नियोजन या संमेलनात सर्वांनी सहभागी होऊन करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी यांनी वुई ऍंड अवर नेशनहुड डिफाईन या पुस्तकातील सूत्रानुसार बहुजनांना कमकुवत करण्याचे प्रयत्न चाललेले असताना, संघ देशभर बहुजनविरोधी मोहिमा फत्ते करत असताना बहुजनातील बेकी धोकादायक असल्याचेत्यांनी अनेक दाखले देत स्पष्ट केले .

फुले शाहू आंबेडकरी विचारवंत प्रा. प्रभाकर पावडे यांनी म.गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेकांना प्रश्न उपस्थित करून पुढे जात होते. त्यांच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी दोघांचीही धडपड समग्र समाजहितासाठी असल्याचे त्यांनी अनेक उदाहरण देवून सांगितले. दोघेही एकमेकांच्या विरोधात हेल्दी डिबेट करत होते, अशी माहिती त्यांनी दिली.प्रसिद्ध शिल्पकार गोपाल नायडू यांनी आपल्या भाषणात फॅसिझमच्या विरोधात सर्व परीवर्तन चळवळींनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.

सत्कार समारोहाचे संचालन विद्रोही कवयित्री माधुरी सेलोकर यांनी केले तर आभारप्रदर्शन सत्यशोधक समाजाचे नागपूर जिल्हाध्यक्ष टेमराज माले यांनी केले. यावेळी वर्धा जिल्ह्याच्या वतीने राजू कळसाईत आणि नंदकुमार वानखेडे यांनी सुद्धा सामेलानाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांचा सत्कार केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय बाभुळकर, अनुज हुलके, बाबा बीडकर, टेमराज माले, शरद वानखेडे, विनोद उलीपवार, संजय नरखेडकर, शुभांगी मेश्राम, मिरा मदनकर, इंद्रपाल जौंजाळकर, रमेश सोनवाणे, प्रदीप शेंडे आदींनी प्रयत्न केले.