पदवीधरच्या अपक्ष उमेदवाराची गाडी थांबवून प्राणघातक हल्ला

0
18

अमरावती – राज्यातील ५ विभागात पदवीधऱ मतदारसंघाच्या निवडणुकांसाठीचा प्रचार आता सुरू झाला आहे. उमेदवारांचे अर्ज निश्चित झाल्यानंतर राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांच्या नेत्यांना घेऊन प्रचारात गुंतले आहेत.तर, अपक्ष उमेदवार स्वत:ची ताकद आजमावत आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्षांमध्येच निवडणूक होत असून इतरही मतदारसंघात अपक्षांनी आव्हान दिलं आहे. अपक्ष उमेदवारांन दाबण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जात आहे. त्यातच, अमरावती पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवारावर हल्ला करण्यात आल्याने या निवडणुकीला गालबोट लागलं आहे.

️अमरावती विभाग पदवीधर निवडणूकीचे अपक्ष उमेदवार विकेश गवालेवर हे अमरावतीवरून मोर्शीकडे प्रचारासाठी जात होते. त्यावेळी, एका चार चाकी वाहनातून ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी गाडीतून उतरत अपक्ष उमेदवारांची विचारपूस केली. त्यानंतर उमेदवार विवेक गवालेकर यांना मारहाणही करण्यात आली. तसेच, तू जर पाठिंबा दिला नाही तर तुझा मर्डर करणार अशी धमकीही अज्ञातांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, विकेश गवालेवर यांना अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अमरावती मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात, १९ अपक्ष

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी ३३ पैकी १० उमेदवारांनी माघार घेतली. आता २३ उमेदवार मैदानात आहेत. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने जाहीर केलेल्या किरण चौधरी यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात भाजपचे डॉ. रणजित पाटील, काँग्रेसकडून धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकार, बहुजन भारत पार्टीचे डॉ. गौरव गवई हे राजकीय पक्षाचे चार उमेदवार असून उर्वरित १९ अपक्ष उमेदवार आहेत. पाच जिल्ह्यांच्या या मतदार संघात ३० विधानसभा मतदार संघ तर ५६ तालुके असून प्रचारासाठी उमेदवारांना फक्त १२ दिवस मिळणार असल्याने अक्षरश: पायाला भिंगरी लावून पदवीधरांपर्यंत पोहोचण्याची कसरत करावी लागणार आहे.