प्रतापगड यात्रेदरम्यान सर्व विभागांनी आपसात समन्वय ठेऊन कामे करावी – स्मिता बेलपत्रे

0
25

 गोंदिया, दि.12 : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी यात्रा भरत असते. सदर यात्रेला भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे यात्रेदरम्यान गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी सर्व विभागांनी आपसात समन्वय ठेऊन कामे करावी. अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी दिल्या.

        प्रतापगड येथे यात्रेच्या अनुषंगाने पुर्वतयारी आढावा सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि.प.चे उपाध्यक्ष यशवंत गणवीर, तहसिलदार विनोद मेश्राम, गटविकास अधिकारी विलास निमजे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, सहायक वनसंरक्षक दादासाहेब राऊत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.डी.जायस्वाल व ग्रामपंचायत प्रतापगड सरपंच भोजराज लोगडे मंचावर उपस्थित होते.

       प्रतापगड यात्रेच्या ठिकाणी कायदा व सुवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस नियंत्रण कक्ष व मदत केंद्राची व्यवस्था करण्यात यावी. नियुक्त करण्यात आलेले महत्वाचे अधिकारी/कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांकासह यादी प्रदर्शित करावी. गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवावा. महत्वपूर्ण जागेवर सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. देवस्थानच्या जागोजागी पथदिवे लावण्यात यावे. यात्रेच्या ठिकाणी येणाऱ्या दुकानांमध्ये २० फुटाचा रस्ता मोकळा ठेवण्यात यावा, जेणेकरुन रुग्णवाहिका व अग्नीशमन वाहने येण्या-जाण्यासाठी मोकळी जागा मिळावी. प्रत्येक ५ दुकानांमध्ये १० फुटाचा अंतर राहणे अनिवार्य आहे.

        यात्रेदरम्यान नियमानुसार व तरतुदीनुसार जिल्ह्यातील विविध तालुक्यातून बस फेरीची विशेष व्यवस्था करण्यात यावी. भाविकांना यात्रेत सहभागी होण्यासाठी नियोजीत जागेवर वाहन पार्कींगची व्यवस्था करण्यात यावी. यात्रेदरम्यान औषधोपचाराकरीता औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवावा. यात्रेच्या ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. यात्रेच्या ठिकाणी तात्पुरते शौचालय/मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी. यात्रेच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच खाद्य पदार्थ विक्रीच्या दुकानाची तपासणी करुन विषबाधेसारखे प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे भोजनदामध्ये शिळे अन्न देण्यात येऊ नये याबाबत विशेष काळजी घेण्यात यावी.

       यात्रेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. संबंधीत विभागानी आपआपली जबाबदारी व्यवस्थीतरित्या पार पाडावी. जर कोणी व्ही.व्ही.आय.पी. पाहुणे आले तर हेलिपॅडची पर्यायी व्यवस्था करुन ठेवावी. एक आपातकालीन पथक तयार करण्यात यावे. महिलांच्या गर्दी नियंत्रणासाठी निर्भया पथक ठेवण्यात यावे. असे निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी सांगितले.

      यात्रेदरम्यान अधिकारी/कर्मचारी यांनी सेवाभावी वृत्तीने कामे करावी. रस्त्यावर दिशादर्शक सूचना फलक लावण्यात यावे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करण्यात यावी. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घ्यावी. विद्युत सेवा अखंडीतपणे सुरु राहील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. यात्रेदरम्यान कृषि विभाग, वन विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन याबाबत माहितीपर स्टॉल लावण्यात यावे. असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांनी सांगितले.

         सभेला आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हा साथरोग अधिकारी निरंजन अग्रवाल, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी.एम.लांजेवार, विद्युत विभागाचे उपअभियंता ए.वाय.शहारे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, ए.आ.वि.प्र.चे प्रतिनिधी अरविंद जनबंधू यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार डी.जी.दरवडे यांनी मानले.