मुलींचा जन्मदर वाढीसाठी व्यापक जनजागृती होणे गरजेचे -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

0
8

‘ बेटी बचाओ बेटी पढाओ ’  सभा

       वाशिम, दि. 15 : मुलींचा कमी होणारा जन्मदर ही चिंतेची बाब आहे. मुलींच्या जन्माचे मोठया प्रमाणात स्वागत करुन मुलींचा जन्मदर वाढीसाठी जिल्हयात यंत्रणांनी समाजातील विविध घटकांसोबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.

          आज 15 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय कृती समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) संजय जोल्हे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त व्ही.डी. सुलोचने, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश शिंदे व जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.

         श्री. षण्मुगराजन म्हणाले, जिल्हयातील सोनोग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान चाचणी होते का हे बघण्यासाठी बनावट ग्राहक पाठवून शोध घ्यावा. सर्व सोनोग्राफी केंद्रांची नियमितपणे तपासणी करण्यात यावी. जिल्हयातील कोणकोणत्या ग्रामपंचायतीमध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे, अशा गावांकडे विशेष लक्ष देवून मुलींच्या जन्माबाबत जनजागृती करुन मुलींच्या जन्माचे महत्व ग्रामस्थांना पटवून दयावे. ज्या गावांमध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत म्हणून वृक्षारोपण करण्यात आले आहे, ती वृक्ष कुठे लावली आहे आणि जीवंत आहेत का याची खात्री बाल कल्याण विभागाने करावी. असे ते म्हणाले.

         श्रीमती पंत म्हणाल्या, ज्या गावांमध्ये मुलीचा जन्म होतो, त्या गावात ढोलताशा वाजवून मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करावा. गावपातळीवर समाजात जावून मुलींच्या जन्माबाबत जनजागृती करावी. असे त्यांनी सांगितले.

         श्री. जोल्हे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत जिल्हयात विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्हयात एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत मुलींच्या जन्माचे प्रमाण 920 इतके होते. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत 1 हजार पेक्षा जास्त मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या 264 होती. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत 1414 मुलींचा जन्म झाला. त्यापैकी 1227 मुलींच्या जन्माचे स्वागत वृक्षारोपण करुन करण्यात आले. अनधीकृत गर्भपात व गर्भलिंग निदान तपासणी होत असल्यास 8459814060 किंवा 18002334475 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

         सभेला जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. किशोर लोणकर, कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. लहाणे, अनसिंग ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. लक्ष्मीकांत राठोड, शहरी बाल विकास प्रकल्प अधिकारी मिनाक्षी भस्मे, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, समितीच्या सदस्य डॉ. अलका मकासरे, डॉ. प्रेमलता आसावा, श्रीमती सोनाली ठाकूर व ॲड. राधा नरवालिया यांचेसह अन्य सदस्य उपस्थित होते. उपस्थितांचे आभार श्री. जोल्हे यांनी मानले.