घरकुलाचे बिल रखडल्याने आत्महत्येचा प्रयत्न

0
9

भंगाराम (तळोधी) : गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बिल न मिळाल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभाराला कंटाळून होळीच्या दिवशी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने ते बचावले. मात्र त्याच्या घरकुलाची गहाळ झालेली फाईल अजूनपर्यंत यंत्रणेच्या हाती लागली नाही. त्यामुळे त्याच्या घराचे बांधकाम ठप्प पडले असून लाभार्थ्यावर आता कर्जाचा डोंगर कोसळला आहे.

इंदिरा आवास योजनेअंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील कपील लक्ष्मण आत्राम (४५) या आदिवासी समाजाच्या व्यक्तीला घरकुल मंजूर झाले.  दरम्यान, कामाच्या प्रगतीनुसार या अनुदानाची रक्कम खर्च करावयाची असते. अशावेळी ३५ हजार रुपये अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून लाभार्थ्याला रक्कम प्राप्त झाली. या रकमेतून त्यांनी घराचे बांधकाम सुरू केले. यानंतर लाभार्थ्याने दुसऱ्या हप्त्याचे बिल मिळावे म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाचा दाखला व कामाचे सकृतदर्शनी फोटो घेवून गोंडपिपरी पंचायत समिती कार्यालय गाठले. त्याने येथील घरकुल विभागात बोमनवार यांच्याकडे घराचे काम सुरू असल्याचा पुरावा सादर केला.  तेव्हा बोमनवार यांनी तुमच्या घरकुलाची कार्यालयीन फाईल उपलब्ध नसल्याचे सांगून ती गहाळ झाल्याचे बोलून दाखविले. यामुळे त्यांची मानसिकता खराब झाली. होळीला राहत्या घरी या विवंचनेतूनच त्यांनी विष प्राशन केले. याची माहिती लाभार्थ्यांच्या पुतण्याला कळताच त्याने ताबडतोब कपील यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.